ठाणे : लॉकडाऊनमध्ये गरिबांवर श्रमिकांवर जो अन्यायाचा मोठा वरवंटा फिरलेला आहे त्याचा त्रास कोरोना संकटापेक्षाही जास्त भयानक आहे. त्याचे मूळ कारण विषमता आणि गरिबांच्या सोयी सुविधांबद्दल असलेली प्रचंड उदासीनता हेच आहे. एकलव्य विद्यार्थ्यांनी समतेचे पाईक
बनून या देशाच्या परिस्थितीला सुधारण्याचे आव्हान पेलले पाहिजे. समतेची ज्योत बनून समाजाला प्रकाशाकडे नेण्यासाठी झटले पाहिजे, अशा शब्दात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी युवकांना प्रोत्साहित केले. समता विचार प्रसारक संस्थेच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या झूम मेळाव्यात त्या बोलत होत्या. आज राजकारण्यांची मूल्यहिनता,अर्थकारणात मोठ्या पुंजीपतींचे राज्य,निवडणुकीतील भ्रष्टाचार, शिक्षणातील विषमता, तथाकथित विकासासाठी पर्यावरणाची दुर्दशा अशासारख्या अनेक गंभीर मुद्यांपैकी कुठल्या मुद्यावर काम करायचे हे ठरवून त्याचा पद्धतशीर पाठपुरावा केलात. त्याकामी समाजातील अन्य संवेदनशील घटकाला सोबत घेतले तर समाज तुम्हाला पुरस्कृत केल्याशिवाय राहणार नाही, असे पाटकर पुढे म्हणाल्या.
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत गजानन खातू यांनी सांगितले की,देशातील अनेक जटील प्रश्नांकडे नकारात्मक दृष्टीकोनातून न बघता ती सकारात्मक प्रक्रिया कशी होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. जेष्ठ कवियत्री, लेखिका निरजा यांनी संस्थेचे अभिनंदन केले. वंचितांचा रंगमंचचे प्रणेते दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी आणि त्यांच्या कन्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि साहित्यिक सुप्रिया विनोद यांनी संस्थेला शुभेच्छा देऊन संगितले की, रत्नाकर मतकरी यांकडे वंचितांचा रंगमंच अर्थात नाट्य जल्लोषचे कार्य पुढे नेण्यासाठी त्या सर्वतोप्रकारे मदत करतील. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय मंगला गोपाळ यांनी संस्थेच्या स्थापनेचे उद्दीष्ट तसेच संस्थेची आजपर्यंतची वाटचाल याबद्दल माहिती दिली.संस्थेचा कार्यकर्ता अजय भोसलेने अनुभवकथन केले. संस्थेचा माजी सचिव आणि हरहुन्नरी कलाकार संजय निवंगुणे यांनी लॉकडाऊन काळात नोकरी करण्याचे आपले अनुभव संगितले. संस्थेची एकलव्य कार्यकर्ती अनुजा लोहा हिने या मेळाव्यात हजेरी लावून आपले गावाकडचे अनुभव सांगितले. एकलव्य कार्यकर्ती दुर्गा माळी हिने संस्थेबरोबर काम केल्याने तिच्या व्यक्तिमत्त्वात, विचारात किती प्रगती झाली, हे नम्रपणे संगितले.