ठाणे : एकलव्य विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत मिळालेले यश, राबोडीच्या अल्फिया शेखला ९३% मिळाले आणि ती शाळेत प्रथम आली आहे, श्रुती खवळे या किसन नगर मधल्या मुलीने ८९.४० % मार्क्स मिळवून किसन नगर महानगर पालिकेच्या शाळेत पाहिला नंबर मिळवला आहे. धर्मवीर नगरच्या जया इंगळे हिने ८२ % मार्क्स मिळवून ती महानगर पालिका शाळा क्रं. १८ मधे पहिली आली आहे. सावरकर नगर आदित्यकुमार ठाकूरला ८३% मार्क्स मिळाले आहेत आणि सावरकर नगर महानगर पालिकेच्या शाळेत तो प्रथम आला आहे.
राबोडीच्या हबीबा अन्सारी ला ८२%, अयान अकील शेखला ८०.२% मिळाले आहेत. किसन नगरच्या सृष्टी दळवीला ७९.४%, वारली पाड्याच्या पूर्वा रहाटवळला ७८.६ %, मानपाड्याच्या प्रतीक्षा लोखंडेला ७७.६%, किसन नगरच्या मिनाक्षी कुऱ्हाडेला ७३.८०%, मानपाड्याच्या संदीप वाडू ला ७३.८ % आणि अनिकेत लोखंडेला ७२ %, कळव्याच्या आकाश कनोजियाला ७२.२%, सावरकर नगरच्या रक्षा कादळगावकरला ७३% आणि तब्बसूम नसीर खान पठाणला ७२% मार्क्स मिळाले आहेत. राबोडीच्या आलिया शेख ला ७९.८%, आशिया पठाणला ७८% मिळाले आहेत. ढोकाळीच्या नीता बिरादरला ७५% आणि भूमिका जाधवला ७६% मिळाले आहेत.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत ठाणे शहरातील एकलव्य विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत चमकदार कामगिरी करुन हे दाखवून दिले आहे की जिद्दीला सीमा नसते, असे समता विचार प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यात आले होते. त्याचा मुलांना फायदा झाल्याचे शाळेतील शिक्षक, पालक आणि मुलांनी आवर्जून सांगितले. एकलव्यांमधील ३ मुली आणि १ मुलगा त्यांच्या शाळेत प्रथम आले आहेत.
वडील मजुरी, आई घरकाम, पत्राचे छोटेसे घर, दाटीवाटीची वस्ती, बाजुला नाला वाहतोय, घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट, कधी आई वडील गावाला व विद्यार्थी इथे दुसऱ्यांकडे राहून शाळेत जातो, घरचे काम करून शाळेत जाऊन अभ्यास करून असे घवघवीत यश प्राप्त करणाऱ्या एकलव्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यांच्या साठी नुसते पास होणे सुद्धा बोर्डात येण्यासारखे कौतुकास्पद आहे. तरीही कितीतरी मुलांना फर्स्ट क्लास मिळाला आहे. आणि वरील विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळवले आहेत.
या सर्व एकलव्यांचं समता विचार प्रसारक संस्थेतर्फे जाहीर गौरव करण्यात येणार आहे. ठाणे शहरातील विविध वस्त्यांमधून राहणारे, अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीशी दोन हात करत जे विद्यार्थी दहावी पास होतात त्यांचा जाहीर गौरव करून त्यांना पुढच्या शिक्षणासाठी संस्थेकडून मदत केली जाते.