ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील आनंद आश्रमात शिंदे-फडणवीस सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त आनंद दिघे यांना अभिवादन केले. प्रथम त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले आणि नंतर आनंद दिघेंच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यावेळी आनंद आश्रमात शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी, भाषण करताना त्यांनी १ वर्षापूर्वी शिवसेनेत केलेल्या बंडाची आठवण करुन दिली. तसेच, आम्ही जा उठाव केला होता जनतेच्या, शिवसेनेच्या आणि आमदारांच्या मनातील सल होती, असेही म्हटले. तर, टीम देंवेंद्र फडणवीसांचं मोठं पाठबळ होतं, असंही त्यांनी सांगितलं.
जनतेच्या मनात, शिवसैनिकांच्या मनामध्ये, शिवसेनेच्या आमदारांच्या मनात जे काही सलत होतं, त्यांच्या मनात जो उद्रेक होता, त्याला वाचा फोडण्याचं काम एकनाथ शिंदेंनी १ वर्षापूर्वी केलं, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेतील बंडाचं कारण पुन्हा एकदा सांगितलं. तसेच, या राज्याचे, देशाने आणि जगाने पाठिंबा दिला. मग, हे सरकार स्थापन झालं. सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. गेल्या १२ महिन्यात या सरकारने समाजातील सर्वच वर्गाला न्याय देण्याचं काम केलं, हे मी छातीठोकपणे सांगतो. प्रथम आम्ही दोघांनी मंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हापासून पहिल्या कॅबिनेट बैठकीपासून सर्वच निर्णय जनहिताचे घेतले, एकही निर्णय वैयक्तिक लाभाचा घेतला नाही, असेही शिंदेंनी म्हटले.
दरम्यान, त्यावेळी, काहीजण आमच्यासोबत होते. तर, अनेकांना काय होईल असं वाटत होतं. या एकनाथ शिंदेंचं काय होईल, असं वाटायचं. पण, मी माझ्या राजकीय जीवनात असे अनेक धाडसी निर्णय घेतले, ज्यामागे बाळासाहेबांची प्रेरणा आणि आनंद दिघेंचं पाठबळ होतं, असेही शिंदेंनी म्हटले. एकनाथ शिंदेंनी जे धाडस केलं, त्या धाडसाच्या पाठिमागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची संपूर्ण टीम उभी राहिली. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदनही करतो आणि मनापासून आभारही मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि गृहमंत्री अमित शहांनी मला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली. तर, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांचेही आभार यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी मानले.
दरम्यान, टेंभी नाक्यावर महायुतीच्या वर्षपूर्तीचा जल्लोष सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना व्हिडीओ कॉल करत त्यात सहभाग नोंदवला, या आनंदात तेही सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना व्हिडीओ कॉलवरून शुभेच्छा दिल्या. यावेळी आश्रमात शिवसेना भाजप युतीचा विजय असो अशी घोषणाबाजी करण्यात आली.