डोंबिवली- कल्याण ग्रामीण मतदार संघ हा शिवसेनेचा गड आहे. डोंबिवलीतील २७ गावांचा विकास व्हावा म्हणून शिवसेना गेले साडेतीन वर्षे सातत्याने प्रयत्न करीत असून या भागातील पाणी समस्या तातडीने सोडवण्यासाठी अमृत योजना कार्यान्वीत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले असून लवकरच या कामाला सुरूवात होईल असा विश्वास शिवसेनेचे नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांच्या मानपाडा येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राजन विचारे, आमदार भोईर, महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृहनेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, युवासेनेचे सचिव पुर्वेश सरनाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, लोकसभा व विधानसभा निवडणूकीत ग्रामीण भागातून शिवसेनेला भरघोस मतदान झाले आहे. काही राजकीय पक्षांची कार्यालये केवळ निवडणूकीसाठी असतात. शिवसेना मात्र बाराही महिने कार्यालयातून जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम करत असते. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , आमदार सुभाष भोईर सातत्याने प्रयत्न करीत असतात. या भागाच्या विकासासाठी शिवसेनेने अर्थ संकल्पात सुमारे ५५० कोटींची तरतूद केली असून या भागातील रस्ते, अंतर्गत रस्ते यांची कामे तसेच अमृत योजना अशा विविध कामांना सुरूवात केली असून यामुळे नजिकच्या काळात या भागाचा चेहरामोहरा बदलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना सत्तेत असूनही विरोध का करते अशी टीका केली जाते. याचा समाचार घेताना शिंदे म्हणाले, महाराष्ट्रातील विरोधी पक्ष काही करत नाही व विरोधी पक्ष कमकुवत आहे. त्यामुळेच शिवसेनेला विरोधी भूमिका घ्यावी लागते. शिवसेनेची बांधलिकी जनतेशी आहे. जनतेच्या प्रश्नासाठी शिवसेना सरकारमध्ये असून ही रस्त्यावर उतरते आहे. शिवसेना सत्तेसाठी लाचार नाही असे ही ते यावेळी म्हणाले.आमदार सुभाष भोईर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केली. यावेळी डॉ. शिंदे आणि महापौर देवळेकर यांची भाषणे झाली.चौकट- कल्याण-डोंबिवलीतही क्लस्टर योजना मंजूर झाली पाहिजे
क्लस्टर योजनेला १४ वर्ष पूर्ण झाली आहेत. सुरूवातीला त्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध केला होता. अनधिकृत इमारतींना क्लस्टर योजना कशी लागू करता येईल असे बोलले जात होते. किती लोक मरणाची वाट पाहणार. त्या इमारतीत ही लोक राहतात. अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. त्यामुळे शिवसेनेने क्लस्टर योजना आणली. या योजनेत अनेक त्रुटी होत्या त्याही आता दूर झाल्या आहेत. कल्याण-डोंबिवलीतही धोकादायक इमारती आहेत. याठिकाणी ही क्लस्टर मंजूर केले पाहिजे,असे ही शिंदे म्हणाले.चौकट- डोंबिवलीत घरच्यासारखे वाटते- अकुंश चौधरी
आमदार सुभाष भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयाला शुभेच्छा देण्यासाठी प्रसिध्द अभिनेता अंकुश चौधरी व महेश मांजरेकर यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी अकुंश चौधरी म्हणाले, डोंबिवलीत मी वारंवार येतो कारण इकडे आलो की मला घरच्या सारखे वाटते. एका गाण्यावर त्यांनी नृत्य करून रसिकांना खूश केले. आमदार भोईर यांचा जनसंपर्क दांडगा असून या कार्यालयामुळे अधिक संपर्क वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.