मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसोबत आज पहाटे गुवाहटीला पोहोचले आहेत. गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आमदारांना ठेवण्यात आलं आहे. मुंबई, ठाणे, सुरत गुवाहाटी असा प्रवास शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा सुरु आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदें यांचा पोलीस ताफा ठाण्यात परतला आहे.
एकनाथ शिंदेसूरतला जाताना त्यांच्यासोबत पोलिसांचा ताफा होता. ते गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांचा ताफा ठाण्याच्या घरी परतला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी ठरते की अपयशी हे लवकरच स्पष्ट होईल परंतु शिवसेनेच्या एका गटाकडून त्यांची होत असलेली अवहेलना आणि त्यातून वाढलेली घुसमट यातून हा विस्फोट झाल्याचे समजते. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर उमटला आणि त्यातून ठिणगी पडली. त्यानंतर शिंदे यांनी बंड पुकारल्याने शिवसेनेत उभी फूट पडली.
महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपबरोबर युती करण्याची अट त्यांनी घातली आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार संकटात आलं आहे. सोमवारी रात्रीच हालचाली झाल्या आणि एकनाथ शिंदे हे काही समर्थक आमदारांसह सूरतला रवाना झाले. मंगळवारी रात्री ते सूरतहून गुवाहाटीला गेले. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेला पोलीस ताफा ठाण्यात परतला आहे.