ठाणे : राज्याच्या सत्तेसाठी उदयास येत असलेल्या नव्या पॅटर्नमुळे ठाणे महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असताना शिवसेनेतील इच्छुकांमध्ये जुंपली आहे. नरेश म्हस्के यांना पक्षाने शब्द दिला असला तरी, असेच आश्वासन दिल्याने मी शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा करून देवराम भोईर यांनी वादाला तोंड फोडले आहे. विद्यमान महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही पुन्हा महापौर होण्यास आवडेल, असे सांगून तेल ओतले आहे. म्हस्के यांनी पदासाठी आपण काम करत नसून पक्षाचा निर्णय अंतिम असेल असे सांगून या वादात रंगत वाढविली आहे.महापौरपदपदासाठी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले देवराम भोईर यांचे नाव चर्चेत आले आहे. पक्षात घेतानाच ही कमिटमेंट दिली होती, असा दावा त्यांनी केला आहे. मात्र, आता संजय भोईर यांना स्थायी समिती दिल्याने देवराम यांचे नाव बाहेर फेकले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. असे असले तरी त्यांनी दावा कायम ठेवला आहे. पालकमंत्री दिलेले आश्वासन विसरणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे महापौर मीनाक्षी शिंदेदेखील पुन्हा इच्छुक असल्याने चुरस वाढली आहे. महापौरपदासाठी ज्यांचे नाव आघाडीवर आहे, त्या म्हस्के यांनी मात्र हा चेंडू पक्षश्रेठींकडे टोलवला आहे. पक्षात काम करणे हाच एकमेव उद्देश असून पदाची कोणत्याही प्रकारची अपेक्षा केली नसल्याचे त्यांनी सांगितले.- संबंधित वृत्त/३>इच्छुकांची मर्जी राखताना पक्षश्रेठीला मात्र तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. एकनाथ शिंदे यांनी भोईर यांना आश्वासन दिले आहे, तर विधानसभेची वारी सुटल्याने नरेश म्हस्के यांनादेखील तेच आश्वासन कसे दिले, याची चर्चा आता रंगू लागली आहे. त्यामुळे राज्याप्रमाणेच ठाण्याच्या महापौरपदाचा तिढा सोडवण्यात शिंदे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
महापौरपदावरून सेनेत जुंपली, एकनाथ शिंदे यांना करावी लागणार कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 1:00 AM