Eknath Shinde ( Marathi News ) : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत पुन्हा बिघडल्याने तपासणीसाठी त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांना ताप आणि थ्रोट इन्फेक्शन झाल्याने मागील चार दिवसांपासून ते विश्रांती घेत होते. मात्र काल रात्री त्यांची प्रकृती सुधारल्याने ते आजपासून पुन्हा राजकीय कार्यक्रमांमध्ये सक्रिय होतील, असं सांगण्यात आलं होतं. परंतु आज पुन्हा एकदा ताप वाढल्याने तपासणीसाठी त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मंत्रिपदे आणि इतर राजकीय बाबींवर चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे हे आज शिवसेनेच्या नेते आणि आमदारांची ऑनलाइन बैठक घेणार होते. परंतु आता पुन्हा तब्येत बिघडल्याने ही बैठक होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तसंच महायुतीची रखडलेली एकत्रित बैठकही आज होण्याची शक्यता होती. या बैठकीत उपमुख्यमंत्रिपदासह खातेवाटपाविषयी सविस्तर केली जाणार होती. मात्र आता या बैठकीबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे.
दरम्यान, ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारच्या शपथविधीचं आयोजन मुंबईतील आझाद मैदान इथं करण्यात आलं आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव अद्याप मंत्रिपदांचं वाटप पूर्ण होऊ न शकल्याने महायुतीकडून हा तिढा कसा सोडवला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.