ठाणे : ठाणे शहराला राज्य सरकारकडून येणेबाकी असलेले पैसे नगर विकासमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहेत. त्यांनी ठाणेकरांचे पैसे अडविले आहेत. ते जर त्यांनी दिले तर ठाण्याचा विकास होईल, अशा शब्दांत खा. नारायण राणे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली. महापालिका निवडणुकीत भाजपची स्वबळावर सत्ता येईल, असा दावाही राणे यांनी केला.
महापालिकेने सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून निधी येणे शिल्लक असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. याकडे राणे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. महापालिकांना त्यांच्या हक्काचा निधी देणे ही त्यांचीच जबाबदारी आहे. शिंदे यांनीच ठाणेकरांचा निधी अडविला आहे. त्यामुळे ते पैसे त्यांच्याकडेच असल्याचा टोला लगाविला. ५०० चौरस फुटांच्या घरांना अद्याप करमाफी दिलेली नाही. अगोदर वचने देतात आणि तोंडाला पाने पुसण्याचे काम ठाण्यातील सत्ताधारी शिवसेना करत असल्याचे राणे म्हणाले. ठाण्यातील सत्ताधारी खोटारडे आहेत. दिलेली वचने पूर्ण करण्याची धमक लागते. ठाण्यातील शिवसेनेत ती नसल्याची टीका त्यांनी केली. ठाण्यात अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. त्यावर कोणाचाच अंकुश राहिलेला नाही. अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित असताना येथे त्या बांधकामांच्या विरोधात तक्रार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात. याचाच अर्थ ठाण्यात पालिका अधिकारी आणि सत्ताधारी शिवसेनेची मिलीभगत आहे. पालिकेचे अधिकारी तक्रारदाराला धमक्या देतात. मात्र, अशा पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नसल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिकेत भ्रष्टाचार वाढलेला आहे. ठाण्याची जनता बेजार झालेली आहे. सत्ताधारी शिवसेनेच्या भ्रष्टाचाराचा बुरखा आम्ही फाडणार असून आगामी महापालिका निवडणुकीनंतर भाजप स्वबळावर सत्तेत येईल, असा दावा त्यांनी केला.
............
वाचली