लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: राज्यात महायुतीचे जागा वाटप कसे होईल व भाजप व अजित पवार गटाच्या पदरात काय पडेल, हा भाग अलाहिदा! परंतु, ठाणे जिल्ह्यात जागा वाटपात शिंदेसेना हा मोठा भाऊ होता, आहे व राहणार, असाच आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धरला आहे.
जिल्ह्यात एकूण अठरा विधानसभा मतदारसंघ असून, जवळपास १० जागांवर शिंदेसेनेने दावा केला आहे. सहा जागांवर भाजप आणि दोन जागा अजित पवार गटाला दिल्या जातील, अशी शक्यता आहे. मात्र, भाजपचे तूर्तास ठाणे जिल्ह्यात आठ आमदार असल्याने विद्यमान आमदारांचे मतदारसंघ सोडण्यास भाजप तयार नाही. राज्यातील अन्य दोन जागा भाजपला देऊन ठाण्यात मोठा भाऊ बनण्याचा शिंदे यांचा आग्रह भाजप मान्य करणार का?, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. जागा वाटपात शिंदे यांना १८ पैकी १० जागा मिळाव्यात, या दृष्टीने ते प्रयत्नशील आहेत. सध्या भाजपचे आमदार अधिक असल्याने ते वारंवार शिंदेसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शिंदेसेनेत नाराजी आहे. शिंदेंना आपले वर्चस्व ठाणे जिल्ह्यावर ठेवायचे आहे. ठाणे जिल्ह्यात अधिक जागा लढवून जिंकून आणण्याची रणनीती शिंदेसेनेने आखली आहे.
महायुतीतील पक्षांना हव्या असलेल्या जागा
शिंदेसेना: भिवंडी ग्रामीण, शहापूर, कल्याण ग्रामीण, अंबरनाथ, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, ओवळा माजिवडा, कोपरी पाचपाखाडी, मुंब्रा कळवा, ऐरोली
भाजप: ऐरोली, बेलापूर, ठाणे शहर, मीरा-भाईंदर, डोंबिवली, उल्हासनगर, मुरबाड, भिवंडी पश्चिम
अजित पवार गट: भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, उल्हासनगर, मुंब्रा-कळवा, मुरबाड, शहापूर या जागा हव्या आहेत. परंतु, त्यांच्या वाट्याला दोनच जागा जातील, असे सांगितले जाते.