- अनिकेत घमंडीडोंबिवली : युतीच्या काळात दोन विधानसभा, तीन लोकसभा आणि तेवढ्याच महापालिका निवडणुका एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण हे दोघे सोमवारी (दि. २०) रात्रीपासून नॉट रिचेबल आहेत. सुरतमध्ये आकाराला येत असलेल्या शिंदे यांच्या ‘ऑपरेशन लोटस’मध्ये चव्हाण यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.माजी खासदार आनंद परांजपे, विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवडणुकीत आमदार चव्हाण यांच्यावर सर्व प्रचारसभा, गर्दीचे नियोजन विश्वासाने सोपवून शिंदे जिल्ह्यातील अन्य उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त असायचे. युतीत असताना आणि आता युती नसताना शिंदेंवर टीकास्त्र सोडण्याचे चव्हाण यांनी एक तर टाळले किंवा विचारपूर्वक विधाने केली. थेट शिंदेंवर का बोलत नाही, असे चव्हाण यांना माध्यमांनी विचारले की, खासगीत शिंदे हे आमचेच असून, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय असल्याचे ते हसत सांगत.सरसंघचालक मोहन भागवत काही महिन्यांपूर्वी ठाण्यात आले असताना शिंदे यांनी जाहीर कार्यक्रमात त्यांची आवर्जून भेट घेतली व भागवतांचा सत्कारही केला होता. भाजप, संघ परिवाराशी त्यांनी नाते घट्ट ठेवले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांच्या यशाकरिता डोंबिवली, कल्याण, कल्याण ग्रामीण तसेच उल्हासनगर भागांतील संघाच्या मंडळींशी संपर्क करून देण्याकरिता चव्हाण यांनी मदत केली होती. याचा उल्लेख शिंदे, चव्हाण हे वेळोवेळी जाहीर कार्यक्रमांत आवर्जून करीत. ऑपरेशन लोटसमध्ये चव्हाण हे शिंदे यांच्यासोबत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमवारच्या भाजप जल्लोषातही ते विधानभवन परिसरात नव्हते, त्यावेळी चव्हाण समर्थकांनी ते एका मोहिमेवर असल्याचे सूचक वक्तव्य केले होते.
अनेक वर्षे जपली मैत्री कल्याण-डोंबिवली महापालिकेने कचऱ्यावर लावलेल्या करासंदर्भात आंदोलन करण्याची घोषणा चव्हाण यांनी केली होती. त्या वेळी शिंदेंकडून चर्चेने समस्या सोडवू, असा प्रस्ताव आल्यावर चव्हाण यांनी रातोरात आंदोलन स्थगित केले होते. त्यानंतर त्या दोघांची या विषयावर भेट, चर्चा झाली नाही; पण त्यावेळीदेखील मैत्री उघड झाली.