मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. शिवसेना आमचीच असा दावा करणाऱ्या शिंदे गटाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिंदे समर्थकांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यास सुरूवात केली आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचा दबदबा लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी याठिकाणी विशेष लक्ष दिले आहे.
पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक आणि पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याचसोबत उद्धव ठाकरे यांनी पालघर ठाणे जिल्ह्याकरिता महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यात आनंद दिघे यांच्या कारकिर्दीत सक्षमपणे महिला कार्यकारणी सांभाळणाऱ्या दिघे समर्थक अनित बिर्जे यांची ठाणे, पालघर महिला जिल्हा संपर्क संघटकपदी नेमणूक केली आहे.
पुण्यात शिवसेनेला धक्काशिवसेनेच्या महाराष्ट्र युवा सेनेचे प्रदेश सहचिटणीस किरण साळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यासमवेत शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अजय भोसले यांनीही प्रवेश केला. माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी याआधीच शिंदे गटाला जवळ केले आहे. साळी माजी मंत्री उदय सामंत यांचे समर्थक आहेत. ते तसेच भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरला आले होते त्यावेळी त्यांचे स्वागत केले होते. त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांसमवेत पंढरपूरला गेले. तिथून पुण्यात आल्यानंतर साळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व शिंदे यांच्याबरोबर जात असल्याचे जाहीर केले. त्याही आधी पुरंदरमधील माजी मंत्री विजय शिवतारे यांनी जाहीरपणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत शिंदे गट जवळ केला आहे.
शिवसेनेतून १२ खासदार बाहेर पडणार?१२ खासदार शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं मोठं विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. रावसाहेब दानवे यांनी जालन्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे. तसेच आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिंदे गटातील नेत्यांशी चर्चा करु आणि त्यांना आगामी निवडणुकीत सहभागी करू, असं रावसाहेब दानवेंनी सांगितलं. राष्ट्रपतीपदासाठी उद्धव ठाकरे हे द्रौपदी मुर्मू यांना देत असतील तर आम्ही त्यांच स्वागत करु, असं मत देखील रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं आहे.