अजित मांडके
ठाणे : उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट सध्या राज्यात चर्चेचा विषय आहे. त्यात ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिल्याने आता ठाण्याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या ठाण्यात येत्या काही दिवसात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातही त्यांची ही सभा दिघे यांच्या टेंभी नाक्यावर घेण्याचा निर्धार ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे आता या सभेकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.
शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर त्यांना पहिली सत्ता ही ठाण्यानेच दिली होती. त्यामुळे ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात आहे. याच ठाण्याने शिवसेनेला मागील २५ वर्षे निर्विवाध सत्ता दिली आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता शिवसेनेत दोन गट झाल्याने जवळ जवळ ९० टक्के शिवसैनिक आणि महत्वाचे पदाधिकारी, ६७ पैकी ६६ लोकप्रतिनिधी हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे सध्या तरी ठाण्यात शिंदे गटाचा वरचष्मा दिसत आहे. दुसरीकडे आता उध्दव ठाकरे गटही मागील काही दिवसापासून आक्रमक झाला असून नुकत्याच झालेल्या दहीहांडी उत्सवात देखील हे दोनही गट बॅनरबाजीतून एकमेकासमोंर आले असल्याचे दिसून आले. त्यात ठाकरे गटाकडून आता पुन्हा जुन्या शिवसैनिकांना नवसंजवनी देण्याचे काम केले जात असून त्यांच्या खांद्यावर महत्वाच्या जबाबदा:या देखील सोपविण्यात आल्या आहेत.
त्यातही टेंभी नाक्याला शिवसेनेच्या दृष्टीकोणातून खुप महत्वाचे स्थान आहे. याच टेंभी नाक्यावर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या माध्यमातून नवरात्रो उत्सव साजरा केला जात होता, तो आजही साजरा होत आहे. तर याच टेंभीनाक्यावरुन दिघे यांनी दहीहांडी उत्सवास सुरवात करुन तो साता समुद्रापार गेला होता. याच भागात आनंद आश्रम आणि शिवसेनेचे निवडणुक कार्यालय देखील आहे. त्यामुळे या टेंभी नाक्याला अनन्य साधारण महत्व आहे. परंतु नुकत्याच झालेल्या दहीहांडी उत्सवात येथेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि दिघे यांना साद घालत आगामी निवडणुकीची डरकाळी देखील फोडली आहे. परंतु आता याच टेंभी नाक्यावर येत्या काही दिवसात बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची डरकाळी कानावर पडणार आहे.
शिवसेनेच्या माध्यमातून महाप्रबोधन यात्रा सुरु करण्यात येणार आहे. या यात्रेची सुरुवात ठाण्यातून करण्याचा निर्धार ठाकरे गटाने केला आहे. त्यातही ही सभा टेंभी नाक्यावर घेण्यासाठी आता प्रयत्न केले जात आहे. त्याचे कारणही तसेच आहे, टेंभी नाक्याची ओळख दिघे यांच्या नावानेच होत आहे. आजही दिघे यांच्या नावाला ठाणोकर खुप महत्व देत आहेत. त्यामुळे आता याच टेंभी नाक्यावर सभा घेऊन दिघे कार्ड वापरण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.