ठाणे : एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी जास्तीत जास्त नगरसेवक व शिवसैनिकांनी उभे राहावे याकरिता शिंदे समर्थकांनी ठाण्यात पदयात्रा सुरू केली आहे. शिवसेनेतील एकेका व्यक्तीकडे जाऊन, त्याची भेट घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तुला कधी भेटले का, त्यांनी तुला कधी फोन तरी केला का. पण शिंदे हे तुझ्या सुख-दु:खाशी जोडले गेलेले होते ना? मग तू शिवसेनेत राहणार की, शिंदे यांच्याबरोबर येणार, असे भावनिक आवाहन करण्यास सुरुवात केली आहे.
ठाणे महापालिकेत ६७ नगरसेवक असून त्यामधील किमान सातजण गुवाहाटी येथे आमदारांवर पाळत ठेवत आहेत. काही शिंदे समर्थक नगरसेवकांवर ठाण्यातील मैदान मारण्याची जबाबदारी सोपवली आहे. शिंदे यांच्या बंडाला ठाणे या त्यांच्या कर्मभूमीतून भरभक्कम पाठिंबा आहे हे शिंदे समर्थकांना दाखवायचे आहे. शिंदे जेव्हा गुवाहाटी येथून आमदारांना घेऊन मुंबईत येतील तेव्हा मुंबईतील शिवसैनिक या आमदारांच्या विरोधात रस्त्यावर निदर्शने, आंदोलन करण्याची दाट शक्यता आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने त्याचा लाभ शिवसैनिकांना तेव्हा होईल. त्यामुळे मुंबईतील शिवसैनिकांशी दोन हात करून आमदारांना संरक्षण कडे पुरवायचे असेल तर ठाण्यातील जास्तीत जास्त नगरसेवक व शिवसैनिक आपल्याकडे खेचण्याचा शिंदे समर्थकांचा प्रयत्न सुरू आहे. ज्या दिवशी आमदार मुंबईत येतील त्या दिवशी विमानतळापासून विधानभवन किंवा राजभवनपर्यंत त्यांना मजबूत सुरक्षा पुरवण्याचे काम ठाण्यातील शिवसैनिकांवर सोपविले जाणार आहे.
घरोघरी जाऊन संपर्कया पार्श्वभूमीवर शिंदे समर्थक अगोदर फोन करून शिवसैनिकांच्या मनोभूमिकेचा अंदाज घेत आहेत. मग शिवसैनिक अनुकूल वाटला की, तीन-चार जण त्याच्या घरी जात आहेत. शिंदे यांनी ठाण्यातील शिवसैनिकांकरिता केलेली मदत, शिवसेनेला केलेले सहकार्य, त्यांची झालेली कुचंबणा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्या उद्धव ठाकरे यांच्याकरिता शिवसेनेत राहण्याचा आग्रह सैनिक धरत आहेत त्यांचा शिवसैनिकांशी असलेला अल्पसंवाद याचे दाखले देऊन एकेक माणूस आपल्यासोबत जोडत असल्याचे शिंदे समर्थकांनी सांगितले. माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे.