ठाणे -एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर त्यांच्या समर्थनार्थ शनिवारी ठाण्यातील शिंदे समर्थक एकवटल्याचे दिसून आले. शिंदे यांच्या लुईसवाडी येथील बंगल्याबाहेर हातात भगवा झेंडा त्यावर धनुष्यबाणाचे चिन्हे, अनाथांचा नाथ एकनाथ, अशा आशयाचे डिजेवर गाणे आणि एकनाथ शिंदे आगे बडो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत शेकडो समर्थकांनी शिंदे यांना जाहीर पाठींबा असल्याचे दर्शविले आहे. यामध्ये काही माजी नगरसेवकांसह, शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि पदाधिकारीदेखील सहभागी झाल्याचे दिसून आले.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांसह अपक्ष आमदारांना सोबत घेऊन बंडाचे हत्यार उपसले आहे. त्यांना आता ठाण्यातही पाठींबा मिळत आहे. याचाच एक भाग म्हणजे शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास शेकडो शिंदे समर्थकांनी शिंदे यांच्या लुईसवाडी बंगल्याबाहेर एकच गर्दी केली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासाठी घोषणाबाजीदेखील करण्यात आली. तर डिजेवर, असा हा धर्मवीर.. अनाथांचा नाथ एकनाथ अशा आशयाची गाणी लावून शिंदे साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा दिल्या जात होत्या.
तर यामध्ये शहराच्या विविध भागातून शिंदे समर्थकांचे जत्थेच्या जत्थे या ठिकाणी टप्याटप्याने सहभागी होत होते. निर्णय तुमचा पाठींबा आमचा, असा आशय असलेले बॅनर कार्यकर्त्यांमध्ये हाती घेतल्याचे दिसत होते. तसेच हातात भगवे झेंडे त्यावर धनुष्यबाणाचे चिन्ह दिसत होते. तर काहींच्या हातात बाळासाहेबांचे फोटो तर काहींच्या हाती, आनंद दिघे यांचे फोटे दिसत होते.
या पदाधिकाऱ्यांनी उध्दव ठाकरे यांचे फोटो किंवा बॅनर हाती घेतले नसल्याचेच दिसत होते. त्यात जोरदार पावसाच्या सरी बरसण्यास सुरवात झाल्यानंतरही शिंदे समर्थक हे घोषणाबाजी करताना दिसून आले.
शिंदे समर्थकांमध्ये माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांच्यासह योगेश जाणकर, विलास जोशी, गणेश साळवी, आदींसह इतर काही महत्वाचे माजी नगरसेवक सहभागी झाले होते. तसेच त्यांच्यासह शिवसेनेचे शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आदींसह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु जमावबंदीचे आदेश असतांनाही पोलिसांनीदेखील केवळ बघ्याचीच भुमिका घेतल्याचे दिसून आले.