ठाणे : एकनाथ शिंदे यांना शिवसेनेत डावलले जात होते. हे सत्य जरी असले तरी त्यांनी शिवसेना सोडू नये, असे प्रांजळ मत ठाण्यातील सर्वसामान्य निष्ठावान शिवसैनिकांनी व्यक्त केले. आनंद दिघे यांच्यानंतर संघटना वाढविण्यात शिंदे यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळे त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असेही मत व्यक्त करण्यात येत आहे.
ठाण्यात शिवसेना बांधणीचे काम हे सुरुवातीला स्वर्गीय आनंद दिघे यांनी केले. त्यानंतर शिवसेनेचे हे संघटन बांधून ठेवण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. शिंदे यांच्या दरबारात आजही प्रत्येकाला न्याय मिळत आहे. शिंदे हे एक निष्ठावान शिवसैनिक आहेत. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पक्षाने त्यांना संधी दिली. मात्र वारंवार त्यांचे पंख छाटण्याचे काम केले. तरी देखील ते पक्षाचे काम करीतच होते. ठाणे महापालिकेवर किंबहुना जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे काम शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे त्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असे मत शिवसैनिकांनी व्यक्त केले. काही शिवसैनिकांनी शिवसेना आणि भाजपने एकत्र यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
शिंदे हे वरिष्ठ नेते आहेत, ते त्यांचा निर्णय घेणार आहेत. मात्र आम्हा शिवसैनिकांना असे वाटत आहे की, त्यांनी शिवसेनेतच राहावे. - सुधाकर कोकाटे, माजी नगरसेवक, शिवसेना