ठाणे - तब्बल ४० आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदेंनी बंड पुकारून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले होते. दरम्यान, भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी स्थानिक पातळीवर शिवसेनेला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत ठाणे आणि नवी मुंबईतील शिवसेनेच्या माजी एकनाथ शिंदेंची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर आता शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अजून एका शहरात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरें यांना मोठा धक्का दिला आहे. ठाणे आणि नवी मुंबईपाठोपाठ कल्याण डोंबिवलीमधील तब्बल ५५ माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
एकनाथ शिंदेंसोबत येणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतील माजी आमदारांमध्ये अनेक स्थानिक प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे ठाणे आणि नवी मुंबईपाठोपाठ कल्याण-डोंबिवलीमध्येही शिवसेनेची संघटना खिळखिली होण्याची शक्यता आहे.
२० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक आटोपल्यावर एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेत बंड पुकारलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या आमदारांची संख्या वाढत गेली. शिवसेनेचे जवळपास ४० आणि अपक्ष ११ असे ५१ आमदार शिंदे गटासोबत गेल्याने अखेर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री बनले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या ठाण्यातील एकूण ६७ माजी नगरसेवकांपैकी ६६ माजी नगरसेवकांनी पाठिंबा जाहीर केला होता. शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना असे अभिमानाने सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात होता. त्यापाठोपाठ काल नवी मुंबईतीलही ३० च्या आसपास माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता.