अंबरनाथ : टोलबंदी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले शिवसेना- भाजपाचे सरकार नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे आयआरबी या टोल वसूल करणा-या कंपनीच्याच उपकंपनीची गाडी वापरत आहेत, असा आरोप मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. राज्याचे मंत्रीच असा प्रकार करीत असतील तर त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करणे व्यर्थ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अंबरनाथमध्ये एसबी या कंपनीत मराठी कामगारांना कामावरून काढल्याने या कामगारांना परत कामावर घेण्याची मागणी मनसेकडून करण्यात येत होती. या कंपनीत मराठी कामगारांवर अन्याय होत असल्याने या कंपनी विरोधात मनसेने मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चानंतर अविनाश जाधव यांनी सरकारवर आरोप करून पालकमंत्र्यांनाच अडचणीत आणले आहे. पालकमंत्री शिंदे हे ठाण्यात फिरताना जी गाडी वापरतात ती गाडी टोल वसूल करणारी आयआरबी कंपनीचीच उपकंपनी असलेल्या मॉडर्न रोड मेकर्स या कंपनीची आहे. राज्यभर जी आयआरबी कंपनी टोल वसूल करते त्याच कंपनीची उपकंपनी असलेल्यांची गाडी वापरत असले तर त्यात भ्रष्टाचारच म्हणावे लागेल, असा आरोप जाधव यांनी केला. राज्यात टोलनाके बंद करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते.मात्र टोलवसुली तर सुरूच असून त्या टोलच्या मोबदल्यात आपला स्वार्थ साधण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. शिंदे वापरत असलेली एमएच 04 एस जे 3366 या गाडीची नोंदणी ही खासगी कंपनीच्या नावावर आहे. खासगी कंपनीच्या नावावर असलेली गाडी पालकमंत्री वापरत असतील तर त्याची त्यांना कल्पना असेलच असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. या संदर्भात पालकमत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की ती गाडी आपल्याला शासनामार्फत आलेली आहे. शासनाच्या एमएसआरडीसीएकडून आलेली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
एकनाथ शिंदे वापरतात आयआरबीच्या उपकंपनीची गाडी; मनसे जिल्हाध्यक्षांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 7:35 PM