ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने `गडपती' या शीर्षकांतर्गत दिवळीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गड-किल्ले स्पर्धेत `साल्हेर' किल्ला साकारणाऱ्या एकता मित्र मंडळाने (समता नगर) प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. प्रथम पारितोषिक असलेल्या ५१ हजार रुपयांच्या रोख रक्कमेपैकी २१ हजारांची रोख रक्कम किल्ले संवर्धनासाठी काम करणाऱ्या दुर्गवीर प्रतिष्ठानला सामाजिक भावनेतून एकता मित्र मंडळाने जाहीर केली आहे. त्यांच्या या कृतीबद्दल उपस्थित शिवप्रेमींनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले.
गड-किल्ले बांधणीबाबतचा छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टीकोन तसेच बांधणीचे कौशल्य आजच्या तरूण पिढीला कळावे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गड-किल्ले यांच्या प्रतिकृती स्पर्धेचे आयोजन दिवाळीमध्ये केले होते. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी आयोजक संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गडकरी रंगायतनमध्ये संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर मनसे नेते अभिजित पानसे, अविनाश जाधव, गजानन काळे, शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, इतिहास अभ्यासक सदाशिव टेटवीलकर, दुर्गवीर प्रतिष्ठानचे संतोष हासुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. मल्हार गड साकारणारे कलाकृती सांस्कृतिक समिती (वाघबीळ) स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे विजेते ठरले. त्यांना २१ हजार रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रकाने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कलाकृती सांस्कृतिक समितीनेही पारितोषिकातील पाच हजारांची रोख रक्कम दुर्गवीर प्रतिष्ठानला जाहीर केली. तृतीय पारितोषिक राजगड साकरणाऱ्या अष्टपैलू मित्र मंडळाने (वर्तकनगर) पटकावले. २५ किल्ले मंडळांना उत्तेजनार्थ रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांना वंदन करुन आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यांनतर गणेश वंदना झाल्यानंतर एकलव्य क्रिडा मंडळाच्यावतीने मल्लखांबाचे प्रात्यक्षिक लहान मुलांनी सादर केले. त्यानंतर अफझालखान वध आणि शिवराज्याभिषेक सोहळप्या प्रसंगांचे सादरीकरण केले. दुर्गवीर प्रतिष्ठानचे संतोष हासुरकर यांनी यावेळी गडसंवर्धन करतांना येणाऱ्या अडचणी व मिळणारे सहकार्य याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. ठाणे जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी संग्रहालय व्हावे याकरिता मनसे पाठपुरावा करणार असल्याचे पाचंगे यांनी सांगितले.