---------------------------------------
टेम्पोची धडक, दुचाकीचालक जखमी
डोंबिवली : कुमार शेट्टी हा झोमॅटोमध्ये नोकरी करीत असून, तो मंगळवारी दुपारी चार वाजता दुचाकीवरून ऑर्डर घेऊन डोंबिवली पूर्वेतून पलावा याठिकाणी जात होता. तेव्हा एका भरधाव टेम्पोची धडक त्याच्या दुचाकीला बसली. यात कुमारच्या डाव्या पायाला, गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
----------------------------------
उपाध्यक्षपदी निवड
कल्याण : कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कल्याण पूर्व उपाध्यक्षपदी चंद्रसेन सोनवळे यांची, तर पश्चिम उपाध्यक्षपदी रवींद्र सावंत यांची नियुक्ती केली आहे. मंडळाचे अध्यक्ष यश परदेशी यांच्यावतीने सोनवळे आणि सावंत यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
--------------------------
पिकअप टेम्पो चोरीला
कल्याण : पश्चिमेकडील गोविंदवाडी बायपासवर एपीएमसी मार्केट कंपाऊंडच्या बाजुला पार्क केलेला पिकअप टेम्पो चोरीला गेल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी टेम्पोचालक सुफियान शेख याने बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.
------------------------------
पाण्याचे पाईप चोरीला
कल्याण : येथील मोहने एनआरसी कॉलनीच्या आवारातील पाणीपुरवठ्याचे लोखंडी पाईप चोरीला गेल्याची घटना बुधवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास घडली. चोरीला गेलेल्या पाईपचे वजन अंदाजे एक हजार किलो आहे. किंमत ३० हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-------------------------------
राष्ट्रवादी शहर जिल्हा निरीक्षकपदी निवड
कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्याण डोंबिवली शहर जिल्हा निरीक्षकपदी स्थानिक नेते तथा सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांची नियुक्ती करण्यात आली. उपमुख्यमंत्री तथा नेते अजित पवार यांच्या वतीने हिंदुराव यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव गर्जे उपस्थित होते. कल्याण - डोंबिवली शहर व जिल्ह्यातील अनेक पदे हिंदुराव यांनी भूषविली आहेत. कल्याण - डोंबिवली शहर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दौरा करावा व जिल्ह्यातील प्रमुख नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेऊन पक्ष संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. भविष्यात होणाऱ्या स्थानिक निवडणुकांच्या दृष्टीने पूर्वतयारी करावी, अशा सूचना नियुक्तीपत्रात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावतीने हिंदुराव यांना करण्यात आल्या आहेत.
----------------------------------
भरधाव कारची तीन वाहनांना धडक
डोंबिवली : येथील पूर्वेकडील सागर्ली जिमखाना रोड लगत पार्क केलेल्या दुचाकी, रिक्षा आणि कारला भरधाव वेगातील अन्य कारने धडक दिल्याची घटना बुधवारी रात्री एकच्या सुमारास घडली. याप्रकरणी नुकसान झालेल्या वाहनचालकांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.
---------------------------------------