ठाणे : भिवंडीतील ७० वर्षीय सोनुबाई चौधरी यांच्या हत्येचे गुढ उकलण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना यश आले. पोलिसांनी चौधरपाड्यातील सोमनाथ आणि नीलम वाकडे या दाम्पत्याला अटक करून त्यांच्याकडून हत्येनंतर चोरी केलेले दागिने हस्तगत केले आहे. कर्ज फेडण्यासाठी क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडिया यासारख्या मालिका पाहून सोनुबाई यांची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिल्याचे ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.सोमनाथ हा बदली कारचालक असून त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी केडीएमसीच्या एका अभियंत्याची गाडी वापरल्याचे तपासात समोर आले. त्या दाम्पत्याला येत्या १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.
भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडूनवघर या गावालगतच्या छोट्या तलावामध्ये २२ नोव्हेंबर रोजी सकाळी एका अनोळखी वृद्ध महिलेचा तोंड बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. डोक्यात अवजड वस्तू मारल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालात निष्पन्न झाले. तपासास सुरुवात केल्यावर हा मृतदेह बापगाव, चौधरपाडा येथे राहणाऱ्या सोनुबाई कृष्णा चौधरी (७०) यांचा असल्याचे समोर आले. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण पोलीस अधीक्षक राठोड यांनी घटनास्थळी भेट दिल्यावर याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय हजारे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तीन पथके तयार केली. त्या पथकांमार्फत चौधरपाडा ते वडूनवघर दरम्यान लावलेले प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज पाहण्यात आले. त्यावेळी सोमनाथ यांच्या संशयस्पद हालचाली जाणवल्यावर या दाम्पत्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्यावर त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. सोमनाथ हा वाहनचालक असून त्याचे वेल्डिंगचे दुकान आहे. तसेच त्याची पत्नी नीलम ही अंगणवाडी सेविका आहे. त्यातच सोमनाथ याने नुकतेच आयफोन, एअर कंडिीानर, मोटारसायकल हप्त्यावर खरेदी के ले होते. त्याचे काही हप्ते थांबल्याने लाखोंच्या कर्जातून मोकळे होण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचे सांगितले.
पेन्शनच्या पैशातून सोनुबाईने घेतले दगिने
सोनुबाई यांचे पती हे पालिकेत नोकरीला होते. तिला दरमहा १५ हजार रुपये पेन्शन मिळत होते. त्यातून त्यांनी मोठ्याप्रमाणात दागिने खरेदी केले. ते त्या कायम जवळ बाळगत असल्याची माहिती नीलमला होती. २१ नोव्हेंबरला सोनुबाई या दुपारी आरोपींच्या घरी गप्पा मारण्यासाठी आल्या. याचदरम्यान त्यांच्या अंगावरील दागिने विकून पैसे मिळविण्याच्या हेतूने नीलमने त्यांच्या डोक्यात धोपटणे मारून ठार केले. त्यानंतर सोमनाथने पुरावा नष्ट केला.
सोनुबाईचा मृतदेह वडूनवघर येथील तलावात फेकण्यासाठी त्याने केडीएमसीच्या अभियंत्याच्या गाडीचा वापर केला. ती मिळविण्यासाठी त्याने बायको आजारी असल्याचे कारण अभियंत्याला सांगितले होते. या दोघांना रविवारी ८ डिसेंबर रोजी अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली होंडा सीटी कार, सोनुबाई यांच्या अंगावरील सोन्याची गंठण, चेन, मण्यांची माळ, एक कर्णफूल असा २ लाख ९० हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.