कल्याण : खड्ड्यांमुळे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जणांना आपले जीव गमवावे लागले असताना, आता कल्याणात गतिरोधकाने गुलशन शेख (५५) या वृद्धेचा बळी गेला आहे. ही घटना शुक्रवारी घडली. अपघातात जखमी शेख यांचा मृत्यू झाला.पश्चिमेतील गोविंदवाडी परिसरात राहणाऱ्या गुलशन शेख या शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास या परिसरातच उभ्या होत्या. त्यावेळी एक भरधाव खासगी बस गतिरोधकावर आदळली. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. गुलशन यांच्या अंगावरून बस गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. स्थानिकांनी अपघाताची घटना बाजारपेठ पोलिसांना कळवली. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला.या रस्त्यावर वर्षभरात १३ अपघात झाले. गोविंदवाडी बायपासचा हा रस्ता नागमोडी वळणाचा असून येथे पथदिवे नेहमीच बंद असतात. याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही पथदिवे लावण्यात आले नाहीत. यामुळेच गुलशन यांचा मृत्यू झाल्याचे गुलाम हैदर (जावेद) आणि मुशीब शेख या स्थानिकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात खासगी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या रस्त्यावर प्रमाणापेक्षा जास्त गतीरोधक आहेत. ते हटवण्याकडे यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचेही स्थानिक सांगतात.
गतिरोधकाने घेतला वृद्धेचा बळी, बस अंगावरून गेल्याने झाला मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 2:25 AM