ठाणे : सत्ताधारी शिवसेनेचे विकास कामांचे काही प्रस्ताव रोखून धरल्यामुळे प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यात कलगीतुरा रंगल्यानंतर आता उभयतांमध्ये समेट झाल्याने २० आॅक्टोबर रोजी होणाऱ्या महासभेत तब्बल ७८ प्रस्ताव मंजुरीकरिता आणले आहेत. यामध्ये रस्त्यांचे रुंदीकरण, मॉडेल रस्ते, शौचालय दुरुस्ती, पायवाटा आदी प्रस्तावांचा समावेश आहे.एकूण ७८ प्रस्तांपैकी सुमारे ५० प्रस्ताव विकासकामांचे असून महापौरांनी सुचवलेल्या कामांचे पुनर्नियोजन आणि त्याकरिता वाढीव तरतूद केली आहे. यात यूटीडब्ल्यूटी रस्ते, ५ रस्त्यांचे रुंदीकरण, ९ मॉडेल रस्ते, शौचालय दुरुस्ती, गटार, पायवाटा आदींचा समावेश आहे. आगामी निवडणुकीच्या तयारीस लागलेल्या सत्ताधारी नगरसेवकांना यामुळे हायसे वाटू लागले असून आता विरोधक कोणती भूमिका घेतात,याकडे लक्ष लागले आहे.मागील काही महासभांमध्ये काही प्रस्तावांवरून महापौर आणि आयुक्त हे आमनेसामने आल्याचे चित्र दिसले होते. मागील महासभेत तर महापौरांनी थेट पंगा घेतला. सत्ताधाऱ्यांचे प्रस्ताव प्रशासनाने रोखले होते. मागील महासभांमध्ये जास्तीतजास्त ५० च्या आसपास प्रस्ताव हे मंजुरीसाठी आणले जात होते. यावेळी ही संख्या ७८ झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सर्वपक्षीय नगरसेवकांना समान संधी दिल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी सत्ताधाऱ्यांना झुकते माप दिल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)
निवडणूक बोनान्झा
By admin | Published: October 15, 2016 6:46 AM