उल्हासनगर: महाराष्ट्र शासनाने लोकसभेच्या प्रचाराच्या हेतूने ३० दिवसांसाठी तब्बल ८४ कोटी रुपये म्हणजेच दिवसाला २ कोटी ८० लाख रुपये खर्च केल्याचा आरोप मनसेचे जिल्हाप्रमुख बंडू देशमुख यांनी केला. राज्याच्या निवडणूक प्रचार प्रमुख पदी भाजपाला करण्याची मागणीही देशमुख यांनी केली आहे.
देशातील लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर आचारसंहितापूर्वी महाराष्ट्र शासनाने एका महिन्यात तब्बल ८४ कोटी रुपये खर्च केले. वर्तमानपत्रावर-२० कोटी, न्यूज चॅनेलवर-२० कोटी ८० लाख, डिजिटल होर्डिंग एलईडीवर-३७ कोटी ५५ लाख व सोशल मीडियावर- ५ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती मनसेचे कल्याण जिल्हाप्रमुख बंडू देशमुख यांनी दिली. सत्ताधारी भाजप सरकारचा सरकारी तिजोरीतून चाललेला खर्च बघून शासनाच्या प्रसिद्धी प्रचार प्रमुखपदी त्यांना नेमण्याचा आरोप केला.
शासनाच्या पैशावर सत्ताधारी पक्षाचा चाललेला निवडणूक प्रचार निषेधार्थ असल्याचे देशमुख म्हणाले. ऐन आचारसंहिता काळात जनतेच्या पैशाचा वापर हा पक्षाच्या प्रचारासाठी केला जाणार आहे. ही गोष्ट मुक्त व निष्पक्ष निवडणुकीसाठी अत्यंत घातक असून निवडणूक आयोगाने यावर आळा घालावा आणि ही प्रसिद्धी मोहीम तात्काळ थांबवावी, अशी मी मागणी बंडू देशमुख यांनी केली. एकीकडे कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन नाही, आशा सेविका तुटपुंज्या मानधनासाठी संपावर जातात. तर दुसरीकडे सरकार प्रसिद्धीला हपापले असल्याचे चित्र राज्यात उभे राहिल्याचेही देशमुख म्हणाले.