कल्याण : लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर निवडणूक विभागाची लगबग सुरू झाली असून निवडणूक साहित्य ठेवण्यासाठी सरकारी मालमत्तांचा ताबा घेतला जात आहे. केडीएमसीची मालमत्ता असलेल्या डोंबिवलीतील क्रीडासंकुलाचादेखील ताबा घेण्यात आल्याने, तेथील जलतरणतलावाच्या वापरावर टाच येणार आहे.कल्याण लोकसभेचे मतदान २९ एप्रिलला होणार आहे. तत्पूर्वी निवडणूक यंत्रणेचे कामकाज जोमाने सुरू झाले असून मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेदरम्यान लागणारे साहित्य तसेच निवडणुकीच्या कामासाठी बाहेरून येणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या निवासासाठी निवडणूक विभागाकडून केडीएमसीच्या मालमत्तांचा ताबा घेण्यात आला आहे. यात डोंबिवलीतील भव्य अशा क्रीडासंकुलाचाही वापर सुरू केला असून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिलेल्या पत्रानुसार महापालिकेने संबंधित जागा निवडणूक विभागासाठी उपलब्ध करून दिली आहे.सद्य:स्थितीला क्रीडासंकुलातील बंदिस्त क्रीडागृह, व्यायामशाळेचा ताबा घेतला असून तरणतलावाच्या जागेचा वापरही त्यांच्याकडून केला जाणार आहे. दरम्यान, ताबा घेण्यापूर्वी व्यायामशाळा व तरणतलाव बंद करून मुलांच्या खेळावर टाच आणू नये, असे पत्र माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे कल्याण पूर्व, ग्रामीण विधानसभा क्षेत्र संघटक कैलास शिंदे यांनी निवडणूक विभागाला दिले होते. केडीएमसीचे सभागृह नेते श्रेयस समेळ यांनीही आयुक्तांना पत्र पाठवून तरणतलावाची जागा देऊ नका, असे स्पष्ट केले होते. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.दुसºया बाजूने प्रवेश देऊजिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिले होते, त्याप्रमाणे महापालिकेने क्रीडासंकुलाचा ताबा निवडणूक विभागाला दिला आहे.तरणतलाव बंद करू नये, अशी सूचना आम्ही केली आहे. त्यावर अधिकाºयांनी दुसºया बाजूने तरणतलावासाठी प्रवेश देऊ, असे सांगितले आहे.यावर आयुक्तांशी चर्चा करून काय तो निर्णय घ्यावा, असे त्यांना स्पष्टपणे सांगितल्याची माहिती केडीएमसीचे इस्टेट मॅनेजर प्रकाश ढोले यांनी ‘लोकमत’ला दिली.क्रीडासंकुलातील तरणतलावाचा वापर करणाºयांचा आढावा घेता याठिकाणी ६३० च्या आसपास आजीवन सदस्य आहेत. आता उन्हाळी सुटीचा मोसम सुरू होणार असल्याने याठिकाणी येणाºयांची संख्या अधिक वाढणार आहे.प्रवेश प्रक्रियादेखील त्यासाठी सुरू झाली असून पुढे दिवसभरात तरणतलावाचा उपभोग घेणाºयांची संख्या पाचशेच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. व्यायामशाळेचा ताबा निवडणूक विभागाने घेतला आहेच; पण आता तरणतलावाच्या वापरावरदेखील निर्बंध येण्याची शक्यता आहे.
निवडणूक विभागाने घेतला क्रीडासंकुलाचा ताबा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:37 AM