-जगन्नाथ पाटीलरामभाऊ म्हाळगींच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेकरिता सक्षम उमेदवार नसल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. त्यांच्यासारखे काम कोण करणार, असा सवाल सर्वच नेत्यांसमोर होता. त्यावेळी वसंतराव भागवत यांनी माझे नाव पुढे केले आणि क्षणार्धात निर्णय झाला. त्यावेळी सगळ्यांमध्ये वयाने मी लहान होतो.युतीचे शिल्पकार स्व. प्रमोद महाजन होते, तर गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते. महाजन यांच्याबद्दल आदर, प्रेम, आपुलकी नक्कीच होती आणि आहे. पण, तरीही मुंडेच जास्त प्रिय होते. १९८२ मध्ये मी ठाणे लोकसभेची निवडणूक लढवली, तेव्हा मतदारसंघ मोठा असल्याने प्रचंड प्रवास करावा लागत होता. दळणवळणासाठी साधनसामग्रीची वानवा होती. आजच्यासारखे ना मोबाइल, ना इंटरनेट सुविधा. दहाबारा गावांमध्ये एखाद्याच घरात दूरध्वनी असला तर असायचा. पण, कार्यकर्ते एकनिष्ठ होते आणि जीवाला जीव देणारी मंडळी होती. त्या निवडणुकीत मुरबाड तालुक्याची जबाबदारी स्व. मुंडे यांच्याकडे होती.स्वत:ची जीप घेऊन ते आले होते. महिनाभर त्यांनी तालुका पिंजून काढला होता. दुपारच्या जेवणाची ज्या गावपाड्यात असेल, तिथे सोय झाली तर झाली, नाही तर ठीक. पण, रात्रीचा मुक्काम मात्र मुरबाडमध्ये शहा यांच्याकडे होता. पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी पडेल ते काम त्यांनी केल्याचे मी जवळून पाहिले. महाजन हे निवडणुकीचे नियोजन अत्यंत चोख करायचे. महाजन यांचे नियोजन, मुंडे यांची मेहनत व कार्यकर्त्यांची साथ यामुळे मी १९८२ मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकलो. काँग्रेसचे प्रभाकर हेगडे, समाजवादी पक्षाचे दत्ताजी ताम्हाणे, शिवसेनेचे सतीश प्रधान यांना मी पराभूत केले होते. स्व. म्हाळगी यांच्या पत्नीने पुण्याहून येऊन माझ्यासाठी प्रचार केला होता. १९८४ मध्ये मात्र स्व. इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे देशातील वातावरण बदलले, मी निवडणूक हरलो. त्यावेळी स्व. शांताराम घोलप हे निवडून आले होेते.लोकसभेच्या दोन निवडणुका लढलो, पण पैसे नेमके किती खर्च झाले, हे माहीत नाही. पक्षाने खर्च केला. मला जो निधी दिला जायचा, तो दर सोमवारच्या आढावा बैठकीत मांडला जायचा. प्रत्येकाचे हिशेबाचे कागद गोळा केले जायचे. इतकी पारदर्शकता होती. आता निवडणुकीची समीकरणे फार बदलली आहेत. २००९ नंतरच्या निवडणुकांमध्ये ज्याच्या हाती सत्ता तोच पारधी, अशी अवस्था आहे.(माजी मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते)- शब्दांकन : अनिकेत घमंडी
इलेक्शन आठवणी: महाजन यांचे नियोजन अन मुंडेंचे परिश्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:51 AM