- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका स्थायी व प्रभाग समिती सभापती पदाची निवडणुक २९ ऑक्टोबरला तर उमेदवारी अर्ज सोमवारी २६ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात येणार आहेत. स्थायी समिती व प्रभाग समितीच्या ४ पैकी ३ प्रभाग समितीवर भाजपाचे स्पष्ट बहुमत असून विशेष समितीचे सदस्य निवडले नसल्याने समितीच्या निवडणुकीवर प्रश्नचिन्हे दाखल झाले आहे.
उल्हासनगर महापालिकेत भाजपाचे स्पष्ट बहुमत असताना, सत्ता मात्र शिवसेना मित्र पक्षाची आहे. भाजपातील ओमी कलानी समर्थक १० नगरसेवकांनी भाजपाच्या उमेदवाराऐवजी शिवसेनेच्या लिलाबाई अशान यांना मतदान केल्याने लिलाबाई अशान महापौरपदी निवडून आल्या. भाजपाने विधानसभेची निवडणुकीत कलानी कुटुंबातील एकाला उमेदवारी न दिल्याच्या निषेधार्थ शिवसेनेला मतदान केल्याची प्रतिक्रिया त्यावेळी ओमी कलानी यांनी दिली होती. दरम्यान सत्तेतील वाटा मिळण्यासाठी ओमी कलानी यांनी स्थायी व प्रभाग समिती सदस्य निवाडीपूर्वी भाजपासोबत असल्याचे सांगितले. दरम्यान, शिवसेनेच्या राजकीय खेळीने फक्त स्थायी समिती सदस्यांची निवड झाली असून विशेष समिती सदस्य निवड महासभा स्थगित झाल्याने झाली नाही. मात्र, भाजपा नेत्यांनी ओमी टीमला प्रभाग समिती मध्ये वाटा देण्याचे आश्वासन दिले आहे.
महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी वरिष्ठ नगरसेविका जया माखिजा यांचे नाव पक्षाने यापूर्वीच घोषित केले. तर महापौर निवडणुकी प्रमाणे स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत राजकीय घडामोडी होण्याचे संकेत शिवसेनेचे नेते देत असल्याने, भाजपात गोंधळ उडाल्याचे चित्र शहरात आहे. सोमवारी २६ ऑक्टोबर रोजी स्थायीसह प्रभाग समिती सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यावेळी शहरातील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. शिवसेनेच्या राजकीय खेळीमुळे मात्र विशेष समिती सदस्य व सभापती पदाची निवड लांबणीवर पडली असून भाजपात याबाबत असंतोष आहे. एकूण ९ विशेष समिती सभापती पदा पैकी ४ सभापती पदे ओमी टीम समर्थक नगरसेवकांना देण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते.
ओमी कलानी यांची कोंडी?महापौर निवडणुकीत भाजपाऐवजी शिवसेना उमेदवार लीलाबाई अशान याना मतदान करून महापौर पदी निवडून आणणारे भाजपातील ओमी कलानी टीमचे समर्थक नगरसेवक नेमके कोणाचे? असे प्रश्न शहरात विचारला जात आहे. भाजपा व शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी जाणीवपूर्वक ओमी कलानी व त्यांच्या समर्थक नगरसेवकांची राजकीय कोंडी केल्याची चर्चा शहरात होत आहे.