अंबरनाथ/बदलापूर : : नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होताच आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या तारखा बदलण्यापासून नव्या तारखा जाहीर करण्यापर्यंतच्या सर्व प्रकरणात राजकीय हस्तक्षेप उघड होत आहे. त्यामुळे सोपी वाटणारी नगराध्यक्ष पदाची निवडणूक आता सोपी राहिलेली नाही हे स्पष्ट होत आहे.अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदासाठी अरविंद वाळेकर आणि पंढरी वारिंगे या दोन गटात मोठी चुरस निर्माण झाली आहे. दोन्ही गट आपापल्यापरीने हे पद मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे शहरात वातावरण तंग होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासन घेत आहे. त्यातच आता नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्याने उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच शिवसेना आपल्या सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना करण्याची शक्यता आहे. शिवसेनेसोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या आणि अपक्ष नगरसेवकांची देखील जमवाजमव सुरू करण्यात आली आहे. भाजपा सत्तेत असली तरी भाजपाने आपला उमेदवार देण्याचे जाहीर केल्याने नेमके भाजपा कुणाला उमेदवारी देणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. भाजपा स्वत: सेनेच्या विरोधात उमेदवारी देण्याची तयारी करत असल्याने शिवसेनेनेही आकडेमोड करण्यास सुरूवात केली आहे. भाजपाच्या उमेदवारीमुळे सेनेला कोणताच त्रास नसला तरी शिवसेना गाफिल राहणार नाही हेही स्पष्ट आहे. त्यामुळे भाजपाला सडेतोड उत्तर देण्यासाठी पालकमंत्री कोणती शैली वापरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर विरोधी पक्षाची भूमिका बजावणाºया काँग्रेसने अद्याप आपली कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे सांभाळण्याची तयारी काँग्रेस व्यक्त करत आहे.बदलापूरमध्ये शिवसेना आणि भाजपा हे प्रमुख दावेदार असले तरी भाजपाने उमेदवारीबाबत आपला निर्णय अद्याप स्पष्ट केलेला नाही. भाजपा सद्यस्थितीत बघ्याच्या भूमिकेत आहे. तर शिवसेनेच्या दोन गटात उमेदवारीसाठी संघर्ष निर्माण झाला आहे. नगराध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार म्हणून नगरसेवक अॅड.प्रियेश जाधव आणि मोहन राऊत यांच्या पत्नी विजया राऊत यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र या दोघांपैकी कुणाला उमेदवारी मिळणार हे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अवलंबून आहे. बदलापूरमधील गटबाजी टाळण्यासाठी नगराध्यक्षपद हे सव्वा- सव्वा वर्ष वाटून देण्याची शक्याता आहे.
नगराध्यक्षपदाची निवडणूक : राजकीय घडामोडींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 1:38 AM