पुणे : साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी हे स्वत: टेक्नोसॅव्ही आहेत. मात्र महामंडळाने नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून राबविली जाणारी संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया अजूनही ‘पोस्टा’च्या जुनाट पद्धतीतून बाहेर पडलेली नाही. व्हॉट्सअॅप आणि ई-मेलने काही सेकंदांत माहिती एकमेकांपर्यंत पोहोचणे शक्य असतानाही त्याचा वापर न करता पोस्टानेच अर्ज पाठविण्याची केलेली सूचना अन्याय करणारी ठरत असल्याची भावना घटक संस्थांची आहे.संमेलनाध्यक्षपदासाठी आलेले उमेदवारांचे अर्ज १२ आॅक्टोबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत महामंडळाकडे पोहोचावेत, असे पत्राद्वारे साहित्य महामंडळाकडून साहित्य परिषदेला सूचित करण्यात आले आहे. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. मात्र व्हॉट्सअॅप आणि ई-मेलवर हे अर्ज न पाठवता ते पोस्टाद्वारे पाठविण्यात यावेत, असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे.महामंडळाने आपली पठडीतील मानसिकता बदलून आजच्या आधुनिक काळात व्हॉट्सअॅप, ई-मेलसारख्या माध्यमाद्वारेही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले पाहिजेत. संस्थेच्या प्रतिनिधींमार्फत अर्ज पाठवा, हा आग्रह चुकीचा आहे. केवळ या नियमामुळे आम्हाला उद्या रात्री स्वखर्चाने माणूस नागपूरला पाठवावा लागणार आहे. कारण कुणाचे नुकसान आम्हाला करायचे नाही, असे मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
निवडणूक प्रक्रिया अजूनही जुनाटच
By admin | Published: October 11, 2016 2:09 AM