अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुका कोरोनामुळे पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे निवडणुकीची वाट पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. प्रभागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुक सतत प्रयत्न करीत आहेत.
एप्रिल २०२० मध्ये अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र कोरोनाचा प्रभाव वाढल्याने पालिकेची निवडणूक स्थगित केली होती. तसेच मतदार नोंदणीचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला होता. मात्र जानेवारीमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने निवडणूक आयोगाने आणि राज्य सरकारने पालिका निवडणूक घेण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू केली होती. फेब्रुवारीत त्या संदर्भातील आदेशही काढले होते. या आदेशानुसार मतदारयादीचे कामही सुरू करण्यात आले. मात्र पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आता पालिकेच्या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरापासून पालिकेची निवडणूक स्थगित राहिल्याने प्रभागात काम करणाऱ्या इच्छुक उमेदवारांची मात्र आर्थिककोंडी सुरू झाली आहे. मतदारांना प्रलोभन देण्यासाठी आणि मतदारांची काही कामे करण्यासाठी इच्छुक उमेदवार पुढे सरसावत आहे. त्यातच लॉकडाऊनच्या काळात इच्छुक उमेदवारांनी मतदारांना मदतीचा हात पुढे केला होता. ---------------------------------------------
सर्वकाही केले मतांसाठी
काहींनी सेवाभावी उद्देशाने, तर काहींनी राजकीय स्वार्थापायी लोकांना मदत केली. या मदतीच्या मोबदल्यात मते आपल्या पारड्यात पाडण्याचा त्यांचा राजकीय प्रयत्न होता. कोरोनाचा प्रभाव कमी होताच लागलीच निवडणूक लागेल, अशी अपेक्षा असताना पुन्हा एकदा निवडणूक पुढे गेल्याने केलेला खर्च वाया गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.