अंबाडी : भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी भिवंडीतील कोंबडपाडा येथील राजया राजंगी हॉल येथे मतदान झाले. ही निवडणूक अत्यंत चुरशीची असून उद्या या निवडणुकीचा निकाल लागणार असून यातील एक जागा आधीच बिनविरोध झाली आहे.या निवडणुकीसाठी सत्तारुढ भाजपाविरोधात सेनेने अखेरच्या क्षणी व्यापारी आणि आडते मतदार संघातील एक जागा देऊ करत मनसेलाही आपल्या तंबूत ओढले. काँग्रेस, राष्ट्रवादी, कुणबी सेना, श्रमजीवी संघटना अशी सर्वपक्षीय मोट बांधत सेनेने निवडणूक रिंगणात उडी घेतली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माजी संचालक मोहन अंधेरे, संजय पाटील, प्रकाश पाटील, पांडुरंग पाटील यांच्यासह ९६ पैकी सुमारे ५६ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या रिंगणात एकूण ४० उमेदवार राहिले. त्यातील हमाल आणि तोलाई या मतदार संघात दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपा पुरस्कृत विलास वामण देसले हे बिनविरोध निवडून आले. त्यामुळे आता १७ जांगासाठी एकूण ३९ उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद झाले. व्यापारी आणि आडते मतदार संघाच्या दोन जागांसाठी सर्वाधिक आठ उमेदवार रिंगणात होते. त्यांच्यासाठी ११२ पैकी १०७ मतदारांनी मतदान केले. तर ग्रामपंचायत मतदार संघातील एक अपक्ष उमेदवार वगळता सरळ - सरळ लढत झाली. यामध्ये कृषी व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदार संघात ११ जागांसाठी २२ उमेदवारांमध्ये सरळ लढत असून ३२१ पैकी ३१७ मतदारांनी मतदान केले. ग्रा.पं. मतदार संघातून ४ जागांसाठी ९ उमेदवारांसाठी ११५६ पैकी ११३२ मतदारांनी मतदान केले. (वार्ताहर)
भिवंडी बाजार समितीचा निवडणूक निकाल आज
By admin | Published: February 15, 2017 4:36 AM