कल्याण : केडीएमसीच्या परिवहन समितीच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकाही पक्षाच्या उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने रद्द झालेली निवडणूक आता मुंबई, ठाणे महापालिकांच्या निवडणुकांनंतर २८ फेब्रुवारीला होत आहे. त्याबाबतची घोषणा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी बुधवारी महासभेत केली. ठाणे, मुंबई महापालिकांत शिवसेना-भाजपा आमनेसामने लढत आहेत. या निवडणुकांचे पडसाद राज्यभरात शिवसेना-भाजपाची सत्ता असलेल्या महापालिकांमध्ये उमटत आहेत. केडीएमसीत भाजपा-शिवसेनेला परिवहन समितीच्या निवडणुकीसाठी युती करता आली नाही. ही राजकीय अडचण लक्षात घेऊन शिवसेना-भाजपाने परिवहन समिती सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. मनसेला शिवसेना व भाजपाची साथ परिवहन समिती सदस्यपदाच्या उमेदवारीसाठी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मनसे, भाजपा आणि शिवसेना यांनी एकही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने ही निवडणूकच पुढे पार पडली नाही. अर्ज दाखल नसल्याने निवड कोणाची करायची, असा प्रश्न प्रशासनाच्या पुढे ठाकला. उमेदवारी अर्ज भरले गेले असते, तर त्याची रीतसर नियुक्तीची घोषणा बुधवारच्या महासभेत होणार होती. मात्र, या सभेत न झालेली निवडणूक २८ फेब्रुवारीला होईल, अशी घोषणा देवळेकर यांनी केली. त्यावर मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी, केवळ निवडणुकीची घोषणा करण्यासाठी सभा बोलवण्याची काय गरज होती, असा सवाल केला. त्यामुळे आता नियुक्तीची घोषणा होणार की निवडणूक, याविषयी सुस्पष्ट करण्यात आले नाही. निवडणूक होणार असल्यास उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे व मागे घेण्याचे वेळापत्रक प्रशासनाला १३ दिवसांत जाहीर करून प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. परिवहन समितीच्या सभेत सदस्य सुरेंद्र आढाव यांनी पनवेल, वाशी व श्रीमलंगगड येथे वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करावी, अशी मागणी केली. त्यावर, २१ नियंत्रक विविध ठिकाणी कार्यरत आहेत, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. वाहतूक नियंत्रक नेमण्याच्या सूचनेनुसार ठराव केला जाईल, असे सभापती भाऊ चौधरी यांनी स्पष्ट केले. तिकीट तपासनीस (टीसी) महिन्याला ३० हजार रुपये पगार घेतात. मात्र, महिनाभरात तीन हजारांचाच दंड वसूल करतात. त्यामुळे त्यांच्या पगारावर खर्च करण्याची काय गरज आहे, असा प्रश्नही आढाव यांनी विचारला. त्यावर सहा टीसी असून त्यांची कामगिरी असमाधानकारक आहे. त्यांना नोटिसा बजावल्या आहेत, असे चौधरी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
मुंबईच्या निकालानंतर परिवहनची निवडणूक
By admin | Published: February 16, 2017 2:02 AM