ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागाच्या गांवखेड्यांचा विकास साधणार्या १३४ ग्राम पंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी घोषीत केल्या आहेत. या ग्राम पंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान होऊन ६ नोव्हेंबरला संबंधित तहसीलदार यांच्या कार्यक्षेत्रात मतमाेजणी पार पडणार आहे. यास अनुसरून ठाणे अधिकारी अशोक शिनगारे यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना आदेश जारी केले आहेत. त्यानुसार ६ ऑक्टाेबरला या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या या निवडणुका आहेत. यामध्ये मुदत संपलेल्या ६१ ग्राम पंचायती असून ७३ ग्राम पंचायतींच्या पाेटनिवडणुका यावेळी हाती घेतल्या आहेत. या १३४ ग्राम पंचायतींसाठी या निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी जिल्ह्याभरातील संबंधीत तहसीलदारांकडून काढण्यात येत आहे. या ग्राम पंचायतींसाठी इच्छुक उमेदवारांना १६ ते २० ऑक्टाेबरराेजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. तर या उमेदवारी अर्जांची छाननी २३ ऑक्टाेबरला हाेणार आहे. यानंतर २५ ऑक्टाेबरला इच्छुकांनी माननिर्देशन पत्र मागे घेता येणार आहे.
निवडणुका घाेषीत झालेल्या ग्राम पंचायतींमध्ये जानेवारी ते डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ६१ ग्राम पंचायतींचा समावेश आहे. तर १६६ सदस्यांसह सात सरपंच पदासाठी यावेळी पाेटनिवडणूक आहे. नव्याने स्थापित व २०२२ मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणकप्रणालीद्वारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणूकांसाठी पारंपारीक पध्दतीने राबविण्याचा हा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहिर करणेत आलेला आहे. या ग्राम पंचायतींपैकी सार्वत्रिक निवडणूकांमध्ये भिवंडीच्या १६ ग्राम पंचायती, शहापूर १६, मुरबाड २९ ग्राम पंचायतींचा समावेश आहे. तर पाेट निवडणुकांमध्ये ठाणे ५, कल्याण ६, भिवंडी ५, शहापूर ४१, मुरबाड १३ आणि अंबरनाथला तीन ग्राम पंचायतींच्या पाेट निवडणुका हाती घेतल्या आहेत.