भिवंडी : महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक चार टप्प्यांमध्ये होणार आहे; परंतु देशातील काही भागांत सातव्या टप्यात होणारे मतदान रमजान महिन्यात येणार असल्याने हे मतदान रमजान महिन्यानंतर घेण्यात यावे, अशी मागणी शहरातील अल्पसंख्यांक नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.सर्व राज्यांतील नागरिक नोकरी व व्यवसायाच्या निमीत्ताने भिवंडीत आले असून, त्यापैकी काहीजण येऊन-जाऊन असतात. काही शहरातच राहत असल्याने रमजान महिन्यात त्यांच्या गावाकडे राहणाऱ्या नातेवाईकांच्या मतदानाच्या हक्कावर गदा येऊ नये, म्हणून त्यांनी ही मागणी उचलून धरली आहे.महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात रमजान महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत; मात्र निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या सातव्या टप्प्यात बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुका रमजान महिन्यात असल्याने त्या रमजान महिन्यानंतर घेण्यात याव्यात, अशी मागणी मुस्लिम रिझर्वेशन फेडरेशनचे शहराध्यक्ष तथा काँग्रेसच्या भिवंडी असल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष तुफैल फारूकी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.रमजान महिन्यापूर्वी अथवा रमजाननंतर या निवडणुका घेतल्यास मुस्लिम समाजातील लोकांना आपला हक्क चांगल्या रितीने बजावता येणार आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. सातव्या टप्प्यातील निवडणूक होऊ घातलेल्या चार राज्यांत मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे. त्यांना रोजा ठेऊन मतदानास जावे लागेल. उपवासाच्या काळात मतदानास जाणे जिकरीचे होणार असल्याने त्यांनी ही मागणी केली आहे.भिवंडीतील यंत्रमाग व्यवसायात मोठ्या संख्येने उत्तरप्रदेश व बिहार येथील कामगार व व्यापारी आहेत. त्यांच्या कुटुंबीयांवर निवडणूक काळात अन्याय होऊ नये. रमजान काळात दिवसभर उपवास ठेऊन, ते धार्मिक कार्यामध्ये मग्न असतात. त्यांना आपला हक्क बजावता यावा, यासाठी शहरातील अल्पसंख्यांकांकडून रमजानच्या काळात निवडणूक घेऊ नये, अशी मागणी या अल्पसंख्याक नेत्यांकडून पुढे आली आहे.१९९५-९६ च्या काळात निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका घेतल्या होत्या. त्यावेळी भिवंडीत समाजवादीचे मोहम्मद अली खान निवडून आले होते. ही निवडणूक रमजान महिन्याच्या काळात झाली. मागील महानगरपालिका निवडणूकही रमजान महिन्याच्या काळात झाली. या दोन्ही निवडणुकांत मुस्लिमांनी मतदान केले होते.- जलील अन्सारी, समाजसेवक, भिवंडी
रमजान महिन्यात निवडणुका घेऊ नये; भिवंडीतील अल्पसंख्याक नेत्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:46 PM