अंबरनाथ: अंबरनाथच्या नवरे पार्क परिसरात असलेल्या एका सोसायटीच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप वाढल्याने दोन गटात हाणामारी झाली. मात्र अंबरनाथ पोलिसांनी तक्रार घेताना शिवसेना गटाकडून आलेली तक्रार गुन्ह्याच्या स्वरूपात नोंदवली तर काँग्रेस गटाकडून आलेली तक्रार अदखलपात्र स्वरूपात दाखल केली.
नवरे पार्क परिसरात न्यू हिल्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीची निवडणूक सुरू असताना या निवडणुकीत सोसायटीच्या सदस्यांवर दबाव आणण्यासाठी काही राजकीय पुढारी आणि पदाधिकारी सोसायटीच्या आवारात आले होते. ही बाब सोसायटी सदस्यांच्या लक्षात येताच त्यांनी स्थानिक नगरसेविका अर्चना रसाळ आणि त्यांचे पती चरण रसाळ यांना मदतीसाठी बोलावले. यावेळी चरण रसाळ यांनी निवडणूक घेणाऱ्या अधिकाऱ्यांना या राजकीय हस्तक्षेपाबाबत माहिती देत बाहेरील सर्व सदस्यांना सोसायटीच्या आज प्रवेश देऊ नका अशी मागणी केली.
निवडणूक घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी देखील ही बाब मान्य करत सोसायटी व्यतिरिक्त सर्व सदस्यांना बाहेर जाण्यास सांगितले. याच गोष्टीचा राग आल्याने अजित नायर आणि त्याच्या दोन ते तीन सहकाऱ्यांनी रसाळ यांना धक्काबुक्की करत त्यांच्यावर रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून वाचण्यासाठी रसाळ यांनी हात टाकला असता त्यांच्या हाताला दुखापत झाली. या घटनेनंतर दोन गटात हाणामारीची घटना देखील घडली.
या प्रकारानंतर अजित नायर यांच्या तक्रारीवरून चरण रसाळ आणि त्यांच्या तीन ते चार सथिदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे रसाळ यांना हाताला दुखापत झालेली असताना देखील पोलिसांनी त्यांची तक्रार केवळ अदखलपात्र स्वरूपात नोंदवून घेतली. पोलिसांनी शिवसेनेची तक्रार नोंदवून घेतली परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांची तक्रार नोंदवली नाही असा स्पष्ट आरोप रसाळ यांनी केला आहे तर पोलिसांच्या या पक्षपाती धोरणाच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.