ठाणे: विद्युत मीटरमध्ये फेरफार करत ५२ लाख ६५ हजारांची वीजचोरी करणाऱ्या ठाण्यातील शीळ, महापे येथील अबुतालिक शमशुद्दीन खान (५७) या प्लास्टिक उत्पादक कारखानदाराला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली असून, वीजचोरीच्या रकमेच्या तिप्पट दंड भरण्याचे आदेश दिले. त्यानुसार, आरोपीला सव्वा कोटींचा दंड भरावा लागणार आहे.
महाराष्टÑ राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भरारी पथकाने १४ जानेवारी २००४ रोजी ठाण्यातील शीळ, महापे येथील आरोपी खान याच्या प्लास्टिक उत्पादक कंपनीत तपासणी केली. त्यावेळी विद्युत मीटरमध्ये फेरफार करत एक विद्युत सील तोडून मागील ३४ महिन्यांपासून वीजचोरी होत असल्याचे आढळून आले. या ३४ महिन्यांत कंपनी मालकाने १० लाख ३२ हजार २६ युनिटची वीजचोरी केल्याचे निदर्शनास आले. त्या वीजचोरीची रक्कम ५२ लाख ६५ हजार ४३० रु पये असल्याने भरारी पथकाने खान यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात विद्युत कलम १३५, १३८ नुसार गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण न्यायाधीश जाधव यांच्यासमोर आल्यानंतर सरकारी वकील विवेक कडू यांनी सादर केलेली साक्ष, पुरावे न्यायालयाने ग्राह्य मानून खान याला दोषी ठरवले.
याबाबत २ जुलै रोजी निकाल देताना न्यायालयाने म्हटले की, आरोपी खान याला वीजचोरी होत असल्याचे माहीत होते. पण आता कंपनीच्या मालकीबाबतचा हक्क तो नाकारत आहे. मात्र कंपनीत सुरू असलेल्या वीजचोरीचा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्युत कायद्यानुसार खान याला दोषी ठरवत न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली.