लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : महावितरणच्या कल्याण परिमंडळात लघुदाब वर्गवारीतील (कृषी वगळून) आठ लाख ७९ ग्राहकांकडे वीज बिलाची ३९१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे व अखंडित वीज सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवनियुक्त मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी गुरुवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
कल्याण परिमंडळातील विजेची हानी कमी करून महसूल वाढीसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी परिमंडळातील अधिकारी, कर्मचारी, संघटना प्रतिनिधी, मीटर रीडिंग, वीज बिल वाटप व पायाभूत सुविधा उभारणाऱ्या एजन्सीज समवेत संवाद साधून आगामी कामांबाबत भूमिका मांडली.
कल्याण-डोंबिवलीचा समावेश असलेल्या कल्याण मंडळ कार्यालय एक अंतर्गत एक लाख ६७ हजार ३२३ ग्राहकांकडे ३८ कोटी ८२ लाख रुपयांचे वीज बिल थकीत आहे. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर, मुरबाड व ठाणे जिल्ह्यांचा ग्रामीण समाविष्ट असलेल्या कल्याण मंडळ कार्यालय दोनमधील दोन लाख ४७ हजार ९९ ग्राहकांकडे १८३ कोटींची थकबाकी आहे. वसई, विरार, वाडा, नालासोपारा, आचोळे या वसई मंडळातील तीन लाख २६ हजार १३२ ग्राहकांकडे १०३ कोटी ८२ लाख रुपयांची, तर पालघर, डहाणू, बोईसर, जव्हार, मोखाडा, तलासरी, विक्रमगड, सफाळे या पालघर मंडळातील एक लाख ३८ हजार ६९५ ग्राहकांकडे ६५ कोटी ३३ लाख रुपयांची वीज बिल थकबाकी आहे.
ग्रामपंचायतींचीही देयके थकीत
ग्रामपंचायतींच्या एक हजार ७१३ पथदीप जोडण्यांचे १२७ कोटी सात लाख आणि पाणीपुरवठा योजनांच्या ९९० जोडण्यांचे दोन कोटी ८६ लाख रुपयांच्या वीज बिल थकीत आहे. पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचे वीज बिल १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून प्राधान्याने भरावेत व याची जबाबदारी संबंधित सरपंच व ग्रामसेवकांवर असल्याचे परिपत्रक शासनाने जारी केलेले आहे. त्यानुसार वीजबिलाचा भरणा न झाल्यास पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असून, होणाऱ्या गैरसोयीस संबंधित ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहणार आहे.
अन्यथा कारवाई करणार
महावितरणची सध्याची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सर्व ग्राहकांकडून चालू वीज बिलासह थकबाकी वसूल करण्याचे निर्देश औंढेकर यांनी दिले आहेत. त्यासाठी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे, थकबाकीपोटी तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची तपासणी व अशा ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर आढळल्यास वीज कायदा २००३ मधील तरतुदीनुसार कारवाईच्या सक्त सूचना त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनीही थकबाकी व फेजोडणी शुल्क भरून विजेचा रीतसर वापर करावा आणि कारवाई टाळावी, असे आवाहन त्यांनी ग्राहकांना केले आहे.
----------