ठाणे : शिवाजीनगर भागात ठाणे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या पथदिव्यातून एका केबलच्या आधारे वीजचोरी केली जात होती. याच केबलमधील विजेचा धक्का निर्दोष मंदार गौरी (१७) या मुलाला बसला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वीजचोरी करणारे आणि महापालिकेच्या बेपर्वाईने मुलाचा बळी गेल्याचे बाेलले जात आहे.
केबलमधील विजेचा धक्का मंदारला बसला आणि तो जखमी झाला. स्थानिक रहिवाशांनी त्याला उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तातडीने दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. कळव्यातील न्यू शिवाजीनगर येथे दरवर्षीप्रमाणेच तलाव तुडुंब भरलेला होता. गुरुवारी दिवसभर संततधार पावसामुळे तलावाचे पाणी रस्त्यावर येऊन गुडघाभर पाणी साचले होते. तलावाच्या बाजूने मंदार जात असताना ठाणे महापालिकेच्या पथदिव्याच्या खांबाच्या केबलचा शॉक लागला. पाण्यात पडलेला मंदार हा आपल्याच भागातील असल्याचे समजल्यावर या भागातील वीजप्रवाह खंडित करण्यात आला. त्यानंतर त्याला पाण्यातून बाहेर काढले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
वेळेत दुरुस्ती झाली असती तर...
पावसाळ्यापूर्वी खांबाच्या दिव्यांची दुरुस्ती करणे अपेक्षित होते; परंतु, निष्काळजीपणामुळे निर्दोष मुलाचा जीव गेला, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. अशीच घटना सात ते आठ वर्षांपूर्वी जानकीनगर परिसरामध्ये स्ट्रीट लाइटचा डीपी उघडा राहिल्यामुळे घडली होती. दोनच दिवसांपूर्वी स्टेशन परिसरातील स्कायवॉकवर स्ट्रीट लाइट डीपीचे झाकण उघडे असल्याचे एका नागरिकाने लक्षात आणून दिले होते.