कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील लिफ्ट गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची परवड होत आहे.
महापालिकेच्या रुग्णालय व्यवस्थापनावर दरवर्षाला कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. रुग्णालयातील सर्व सेवा सुविधा अद्ययावत असतील तर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळू शकतो. कोरोना काळात आरोग्य सेवा अद्ययावत होत असताना रुग्णालयातील अन्य सेवा सुविधाही अद्ययावत केल्या जाणे अपेक्षित होते. शास्त्रीनगर रुग्णालय तर कोविड रुग्णालय करण्यात आले होते. आता कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्याने हे रुग्णालय सर्व प्रकारच्या उपचारासाठी सुरु आहे; मात्र रुग्णालयातील लिफ्ट बंद आहे. काही दिवसांपूर्वी याच रुग्णालयातील वाॅर्डबॉयने गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी हे रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आता लिफ्ट बंद असल्याने रुग्णालय पुन्हा चर्चेत आले आहे. दरम्यान, याबाबतचा प्रस्ताव तयार असून, लवकरच लिफ्ट दुरुस्ती केली जाईल, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.