ठाणे: ठाण्यातील वर्तकनगर भागातील रेमंड कॉम्पलेक्समधील विस्टा इमारतीच्या ए विंगची लिफ्ट पहिल्या मजल्यावरुन कोसळल्याची घटना सोमवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत शुभ मंगरूळकर हा ११ वर्षीय मुलगा किरकोळ जखमी झाला असून त्याच्यासह चौघेजण सुखरुप बचावल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. लिफ्टच्या मेन्टनसमध्ये निष्काळजीपणा झाल्यामुळेच ही घटना घडली असून संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी येथील निवासी रात्री इमारतीबाहेर एकवटले होते.
रेमंड कॉम्प्लेक्स, पोखरण रोड क्रमांक एक येथील विस्टा या तळ अधिक ४१ मजली इमारतीच्या ए विंग मधील एका लिफ्टचा तळ मजल्यावरून वर जात असताना पहिल्या मजल्यावर रोप तुटला. त्यामुळे ही लिफ्ट तळ मजल्यावर कोसळली. ही माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलासह वर्तकनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी इमर्जन्सी टेंडरसह दाखल झाले होते.
अपघातग्रस्त लिफ्टमध्ये ११ वर्षीय शुभ याच्यासह चौघेजण अडकले होते. यात शुभच्या डाव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. त्याच्यासह दोन अनोळखी कामगार तसेच याच इमारतीमधील रहिवासी नरेश शर्मा (३०) असे चौघेजण हाेते. या घटनेत हलगर्जीपणा करणाºया लिफ्टचे मेन्टनेस पाहणाºया ठेकेदाराविरुद्ध कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी वर्तकनगर पोलिसांकडे केली आहे.