कल्याण : केडीएमसीने कचोरे येथे बीएसयूपी घरकुल योजनेतून उभारलेल्या घरांचे वाटप लाभार्थींना करण्यात आलेले नाही. मात्र, त्यातील एका इमारतीमधील लिफ्ट चोरट्यांनी चोरून नेली आहे. त्यामुळे या इमारतींकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे लक्ष नसल्याचा आरोप लाभार्थींनी केला आहे.
केंद्रात यूपीए सरकार असताना केडीएमसीने बीएसयूपी योजनेतून १३ हजार घरे बांधण्याच्या प्रस्ताव सादर केला होता. त्याला सरकारने मंजुरी दिली. मात्र, ही योजना विविध चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने योजनेचे काम धीम्या गतीने सुरू होते. त्यामुळे घरे बांधण्याचे उद्दिष्ट सात हजार घरांवर आले. मनपाने उंबर्डे, इंदिरानगर, बारावे, दत्तनगर, त्रिमूर्तीनगर येथे घरे बांधली. त्यापैकी केवळ दीड हजार नागरिकांना घरांचे वाटप केले.
कचोरे येथे १९ इमारती बांधलेल्या असून, तेथे केवळ १५६ लोकांना घरे दिली गेली. उर्वरित इमारती पडून आहेत. लाभार्थींना घरे दिली जात नसल्याने या घरातील फरश्या, नळ, दरवाजे, खिडक्या चोरीस गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. आता तर चोरट्यांनी चक्क इमारतीची लिफ्ट चोरून नेली आहे. याप्रकरणी शाहिस्ता शेख, सनम शेख, युसूफ मेमन आणि विकी चासकर यांनी आवाज उठविला आहे. त्यांनी सांगितले की, गोविंदवाडी रस्ते प्रकल्पात ७५१ नागरिकांची घरे बाधित झाली होती. त्यांना कचोरे येथील बीएसयूपी प्रकल्पात घरे देण्यात येणार होती. मात्र, ती अद्याप दिलेली नाही. त्यामुळे घरे धूळ खात पडून आहेत. या इमारतींच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकही नेमलेला नाही. त्यामुळे तेथील साहित्याची चोरी होत आहेत. त्याचा कोणीही वाली नाही.
मनपाने केले हात वर
याविषयी केडीएमसी प्रशासनाकडे विचारणा केली असता मालमत्ता विभागाकडून काळजी घेतली जात नाही, असे सांगून त्यांनी
हात वरती केले.
-------------------------