मीरा रोड : उत्तन नाक्यावर मुख्य रस्त्यालगत सीआरझेडमध्ये बेकायदा बांधलेल्या शॉपिंग सेंटरच्या काही गाळ्यांवर मीरा-भाईंदर महापालिकेने साेमवारी कारवाई केली. शॉपिंग सेंटरच्या मागचे नव्याने बांधलेले गाळे तोडले आहेत. मात्र, त्याआधी बांधलेले समोरचे गाळेसुद्धा तोडण्याची मागणी होत आहे.
उत्तन नाक्याजवळ नवीखाडी लगत बांधलेल्या महापालिकेच्या मंडई समोरच रस्त्यालगत सीआरझेडमध्ये ही वाणिज्य दुकाने असलेली इमारत वर्ष-दोन वर्षांपूर्वी बांधली होती. आता शालू शेख या इसमाने मागच्या बाजूस आणखी ११ गाळ्यांचे बेकायदा बांधकाम केले होते. याप्रकरणी तक्रारी होऊनही स्थानिक प्रभाग अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते. अखेर आयुक्त दिलीप ढोले यांच्या निर्देशांनुसार उपायुक्त अजित मुठे यांनी उपस्थित राहून या शॉपिंग सेंटरच्या मागील बाजूस बांधलेल्या ११ गाळ्यांवर कारवाई केली. विभागप्रमुख नरेंद्र चव्हाण, सहपालिका अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस उपस्थित होते. या शॉपिंग सेंटरच्या समोरील पत्र्याचे शेडही पाडण्यात आले.
शालू शेख याने उत्तन परिसरात अनेक बेकायदा बांधकामे केली आहेत. त्याची विक्री करून लोकांची फसवणूक करत आहेत. पालिका अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याने त्यांची बांधकामे वेळीच तोडली जात नाहीत. उलट त्या बांधकामांना नळजोडणी, कर आकारणीपासून सर्व सुविधा व संरक्षण दिले जाते. खाजगी आणि सरकारी जमिनींवर बेकायदा बांधकामे करणाऱ्यांवर आणि संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होत नसल्याने बेकायदा बांधकामे सुरू असल्याचे तक्रारदार चंदन ठाकूर यांनी सांगितले.