लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: पुण्यात घडलेल्या घटनेनंतर ठाण्यातही राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली असून, त्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी हॉटेल, पब, बारवर कारवाई केली. जिल्ह्यातील ११ हॉटेल आणि बारचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने निलंबित केले. अल्पवयीन मुलांना मद्य देणे, रात्री उशिरापर्यंत बार सुरू असणे अशा विविध कारणांमुळे हे परवाने निलंबित केल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली.
मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांच्या विरोधात वाहतूक विभागाकडून कारवाई सुरू झाली. उत्पादन शुल्क विभागाकडूनही कारवाईचा दट्ट्या दिला जात आहे. भिवंडी आणि ठाण्यात ठिकठिकाणी बेकायदा ढाबे, हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने मद्य विक्री होत आहे. उत्पादन शुल्क विभागाने अचानक काही बार, ढाबे, पब्स यांना भेट दिली असता अल्पवयीन मुलांना मद्य देणे, रात्री उशिरापर्यंत बार सुरू ठेवणे असे काही प्रकार निदर्शनास आल्याने कारवाई करण्यास सुरुवात केली. नियमांचे उल्लंघन केलेल्या ११ हॉटेल, बारचे परवाने निलंबित केले आहेत.