- लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अकरावी आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया वेळापत्रकानुसार शुक्रवारपासून सुरू झाली. वेबसाईटवर फॉर्म अपलोडच झाला नसल्याने ठाणे जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थी आणि पालकांचा पहिल्याच दिवशी हिरमोड झाल्याने ते तसेच घरी परतले. ढिसाळ यंत्रणेचा फटका विद्यार्थ्याना सहन करावा लागला. दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेशासाठीची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली. विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग आजपासून भरावयाचा होता. त्यादृष्टीने ठाण्यातील अनेक शाळांनी आपल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बोलावले होते. पहिल्याच दिवशी अतिरिक्त ताण पडू नये, या उद्देशाने शाळांनीही तुकडीनुसार आणि त्यातही थोड्या थोड्या संख्येने विद्यार्थ्यांना शाळेत अर्ज भरण्यासाठी बोलावले होते. विद्यार्थ्यांनी सकाळपासून शाळेत जमण्यास सुरूवात केली. मात्र वेबसाईटवर तो फॉर्मच मिळत नव्हता. त्यामुळे फॉर्म भरणारे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारी चारनंतर तो फॉर्म वेबसाईटवर अपलोड होईल, असे सांगितले जात होते. मात्र दुपारनंतरही फॉर्म न मिळाल्याने विद्यार्थी आणि पालक चिडले. मात्र बराच वेळ यंत्रणा अद्ययावत होत नव्हती. त्यामुळे अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी उद्या येण्याच्या सूचना दिल्या.फॉॅर्मच्या त्रुटी कारणीभूतआॅनलाईन अर्जांची प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होणार असल्याने त्याचे डेमो सादरीकरण झाले. मात्र त्यावेळी फॉर्ममध्ये काही त्रुटी आढळल्याने त्यात सुधारणा करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे सुधारित फॉर्म अपलोड झाला नाही. त्याचे काम सुरू असून त्यासाठी आणखी एखादा दिवस जाण्याची शक्यता आहे. मात्र उद्या तो फॉर्म अपलोड करण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेचा शुक्रवारी पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी फॉर्मच वेबसाईटवर उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना उगाच थांबविण्यापेक्षा घरी पाठविले. सरकारी यंत्रणेचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. उद्या तरी तो फॉर्म भरला जावा, अशी अपेक्षा आहे. - राजेंद्र राजपूत, मुख्याध्यापक, मो. ह. विद्यालय