डोेंबिवली : पूर्वेतील फडके रोडवरील दुकानदारांनी व्यापलेले पदपथ आणि फेरीवाल्यांनी बळकावलेला रस्ता यामुळे पादचाऱ्यांना त्रास होतो. या संदर्भात केडीएमसीकडे अनेकदा तक्रारी करूनही प्रभाग क्षेत्र अधिकारी व कर्मचारी ऐकत नसल्याने भाजपाचे चार नगरसेवक बुधवारी आक्रमक झाले. फेरीवाल्यांना हटवण्यासाठी ते स्वत:च रस्त्यावर उतरले.सारस्वत कॉलनीच्या नगरसेविका खुशबू चौधरी, संदीप पुराणिक, विश्वदीप पवार आणि राजन आभाळे या चार नगरसेवकांनी इथून पुढे पदपथावर अतिक्रमण केल्यास अशीच कारवाई स्वत:सह कार्यकर्ते करतील, असा पावित्रा घेतला. महापालिकेचे अधिकारी सायंकाळी ७.३० नंतर घरी जातात. त्यांना कितीचा हप्ता जातो, याची संपूर्ण माहिती असल्याचा आरोप नगरसेवक पवार व नगरसेविका चौधरी यांनी केला. विशेषत: साबळे आणि कुमावत या महापालिकेच्या कर्मचाऱ्यावर त्यांनी कटाक्ष टाकला. प्रभाग अधिकारी स्वाती सिंहासने या देखील घरी असल्याचे उत्तर देऊन हात कशा काय झटकू शकतात, असा आरोपही त्यांनी केला. आयुक्तांना वेळोवेळी पत्र देऊनही ते लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांना प्रभाग अधिकाऱ्याचा दर्जा कसा देतात, हे सगळे प्रश्न अनुत्तरीत असले तरी यावरून प्रशासनाची मिलीभगत असल्याची टीका चौधरी यांनी केली आहे. ‘संगीता सायकल मार्ट’ या दुकानदाराची मुजोरी वाढली आहे. पदपथावरच त्याने दुकान मांडले आहे. हे अधिकारी कसे खपवून घेतात. मुख्य रस्त्यांचीच अशी अवस्था असले तर पदपथावर पादचारी कसे चालणार, असा संतप्त सवाल करीत त्यांनी प्रशासनाला टीकेचे लक्ष्य केले आहे. अतिक्रमणविरोधी पथकाची गाडी ही शोभेसाठी फिरते. त्यात असलेला माल हा कारवाईत पकडलेला नसतो. तो त्यांना त्यांचा वाटा म्हणून मिळालेला असतो, असा आरोप पवार यांनी केला आहे. ज्येष्ठ नागरीकांवर दुचाकी स्वारांचे हल्ले, सोनसाखळी खेचणे हे प्रकार वाढीस लागले आहेत, असे पुराणिक यांनी सांगितले. यावर कडक उपाययोजना आयुक्तांनी कराव्यात. स्टेशन परिसरात २०० मीटर पर्यंत ना-फेरीवाला क्षेत्र आहे. मात्र, त्याबाबतचा कायदा कागदावरच आहे. (प्रतिनिधी)नारळ विक्रीवर आक्षेपशिवसेनेच्या नारळ विक्रीवरही या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. शिवमार्केट परिसरातील शाखा प्रमुख संदीप नाईक यांनी नारळ विक्रीचे दुकान मांडले आहे. त्यावर विक्रीसाठी परप्रांतीयांना रोजगार दिला आहे. त्यामुळे हे परप्रांतीयांचे पोट भरण्याचे काम असल्याची टीका पवार यांनी केली आहे. या बदल्यात अधिकृत गाळ््यांत रोजगारासाठी संधी द्यावी, असे पवार म्हणाले.
भाजपा नगरसेवकांचा फेरीवाल्यांविरोधात एल्गार
By admin | Published: March 30, 2017 6:33 AM