ठाणे : ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बचावासाठी तसेच अनेक प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी रविवारी १७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता सोनाळे मैदान, भिवंडी येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ओबीसी समन्वय समिती - ठाणे चे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
ओबीसींच्या संविधानिक आरक्षणासमोर कधी नव्हे एवढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. प्रबळ मराठा समाजाने ओबीसीमधूनच ५० टक्केच्या आतील आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे दाखले मिळावेत म्हणून तीव्र आंदोलने सुरू केली आहेत. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षण हक्कांवरच गदा येणार आहे. प्रस्थापित मराठा जातीचा ओबीसीमध्ये समावेश करू नका. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा. राज्याच्या सेवेतील ओबीसींचा अनुशेष विशेष मोहिमेद्वारे भरून काढावा. ओबीसींना लोकसभा व विधानसभेत आरक्षण लागू करा. महिला आरक्षणात ओबीसी महिलांना २७ टक्के आरक्षण द्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कमी झालेले ओबीसी आरक्षण पूर्ववत करा. ओबीसी विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी मंजूर झालेली ७२ वसतिगृहे जिल्हावार त्वरित सुरू करावीत. त्याच्यासाठी सावित्रीबाई फुले आधार योजना चालू करा या ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली.
या ओबीसी एल्गार महामेळाव्याला केंद्रीय पंचायती राज मंत्री कपिल पाटील, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गणेश नाईक, राजाराम साळवी, ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे व माजी खासदार जगन्नाथ पाटील, सुभाष भोईर आदि सर्वपक्षीय ओबीसी नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी ओबीसींनी वा महामेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन ओबीसी समन्वय समिती - ठाणे चे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी केले आहे.