रणजित इंगळे, ठाणे: महानगर पालिका आणि राज्य शासनाच्या समाजकल्याण खात्याने प्रमाणित केलेले गटई स्टॉल हटवण्यासाठी ठामपा अधिकार्यांवर भाजपचे मा. नगरसेवक संजय वाघुले हे दबाव टाकत आहेत. त्यामुळे गटई स्टॉल्सवर कारवाई होत असल्याचा आरोप करीत हुतात्मा दिनी गटई चर्मकार समाज कामगार संघटनेच्या वतीने राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला ‘रापी मोर्चा’ पोलिसांनी अडविला. त्यामुळे काही वेळ पोलीस आणि मोर्चेकर्यांमध्ये चकमक झाली. दरम्यान, या प्रकरणी चौकशी करुन सात दिवसात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन ठाणे नगर पोलिसांनी दिले.
ठाणे महानगर पालिकेने महासभेमध्ये ठराव करून चर्मकारांना गटई स्टॉल्सचे परवाने दिले आहेत. तसेच, समाज कल्याण खात्यानेही शहरातील 238 स्टॉल्सला प्रमाणित केले आहे. हे सर्व स्टॉल्स वाहतुकीला अडथळा ठरणार नाहीत, या पद्धतीने उभे केले आहेत. तसेच, ठाणे स्टेशन परिसरात गोरगरीब फेरीवाले रस्त्याच्या कडेला उभे राहून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. या सर्वांना त्रास देण्याचा प्रयत्न मा. नगरसेवक संजय वाघुले हे करीत आहेत. त्यासाठी ते खोट्या तक्रारी करीत आहेत. तसेच, काही दुकानदारांना खोट्या तक्रारी करण्यास प्रवृत्त करीत आहेत. विशेष म्हणजे दिव्यांग,फेरीवाले, चर्मकारांचे स्टॉल्स जप्त करण्यासाठी ठामपा अधिकार्यांवर दबाव आणत आहेत. या संदर्भात गटई चर्मकार समाज कामगार संघटनेने अनेकवेळा तक्रारीही केल्या आहेत. मात्र, पोलीस आणि ठामपा प्रशासन कारवाई करीत नाही.
संजय वाघुले यांच्या या खोट्या तक्रारींमुळे गोरगरीब चर्मकारांसह दिव्यांग, फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे नमूद करीत चर्मकारांनी संजय वाघुले यांच्या कार्यलयावर मोर्चा नेण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार, सुमारे 500 चर्मकार आपल्या कुटुंबासह या मोर्चासाठी उपस्थित होते. ठाणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करुन या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मात्र, थोड्याशा अंतरावरच हा मोर्चा अडविण्यात आला. यावेळी, राजाभाऊ चव्हाण यांनी, “ हा मोर्चा कोणा पक्षाविरुद्ध किंवा व्यक्तीच्या विरोधात नसून प्रवृत्तीच्या विरोधात आहे. केवळ दलितांना हीन लेखण्यासाठी जर कोणी चर्मकारांच्या स्टॉलवर आणि फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. आज हा मोर्चा अडवण्यात आला असला तरी हे आंदोलन थांबणार नाही”, असा इशारा दिला.
यावेळी राजकुमार मालवी, संतोष अहिरे, सुभाष अहिरे, कैलास लोंगरे, कलिराम मंडराई, गोपाल विश्वकर्मा, मनिषा चव्हाण आदी उपस्थित होते.