शहापूर : पंधरवडाभर सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे हैराण झालेल्या नेहरोली येथील संतप्त महिलांनी सोमवारी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली आणि उपस्थितांना जाब विचारला. तर चांग्याचापाडा येथील ट्रान्सफॉर्मर १३ दिवस बंद असूनही त्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याने शेणवा-डोळखांब रस्त्यावर ग्रामस्थांनी रास्ता रोको करून महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा निषेध केला.नेहरोली परिसरात विजेचा दाब कमी आहे. शिवाय भारनियमनामुळे अंधाराचा सामना करावा लागतो आहे. कृत्रिम पाणीटंचाई सुरू आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. पण अधिकारी जागेवर नसल्याने त्यांना परत फिरावे लागले.शहापूर शहरासह अर्जुनली, खरीवली, बामणे स्विचिंग स्टेशन, भटपाडा, सरलांबे, कोळकवाडी, मांजरे, टेंभुर्ली, कुल्हे येथील उच्च दाबाचे नऊ खांब आणि लघुदाबाचे २७ खांब वाकले असून वीजवाहक तारा तुटून पडल्या आहेत. शहापूर पाणी योजनेचा पंप असणारा ट्रान्सफॉर्मर, उंबरवाडी व तलवाडा येथील ट्रान्सफॉर्मर बंद पडले आहेत. यामुळे या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले असून बहुतांश ठिकाणी विजेअभावी पाणीयोजना ठप्प आहेत. त्यामुळे पाण्याचे संकट गंभीर झाले आहे.आधीच सहा ते आठ तास भारनियमन सुरू असताना वादळी-वाºयासह झालेल्या परतीच्या पावसामुळे रविवारी संध्याकाळी शहापुरातील शिवशक्ती राईसमिलजवळील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला आणि संध्याकाळी 5पाचपासून वीज बेपत्ता झाली आणि शहापूर तालुका अंधारात बुडाला. भारिनयमनापेक्षाही अधिक काळ वीजपुरवठा खंडित राहिल्याने आणि वारंवार सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे शहापुरातील नागरिक, तालुक्यातील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत कधी होईल, या बाबत विचारणा करण्याकरिता महावितरण कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तेथे कोणीही फोन उचलत नसल्यामुळे ग्रामस्थांचा पारा चढत गेला. अखेर सात तासांनी म्हणजे मध्यरात्री १२ वाजता वीजपुरवठा सुरू झाला. त्यानंतर सोमवार सकाळपासून पुन्हा भारनियमनामुळे बत्ती गुल झाली. शहापूर शहरात सतत विजेचा लपंडाव सुरूच असून नागरिकांत प्रचंड संताप आहे.परतीच्या पावसामुळे खर्डीत वीज जाण्याचे प्रकार वाढले-खर्डी : परतीच्या पावसामुळे विजेसह वादळी वाºयाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे खर्डी विभागाची बत्ती गुल होण्यात वाढ झाली असून रात्र अंधारात काढावी लागते. दोनतीन दिवसांपासून दुपारनंतर उकाड्याने अंगाची लाहीलाही होते. परतीच्या पावसाचे ढग सर्वत्र दाटून आले की, काळोखाचे वातावरण तयार होते. वादळी वाºयासह विजांचा प्रचंड कडकडाट सुरू होतो. बरोबर त्याच काळात घरातील वीजही गुल होते. ती कधी मध्यरात्री, तर कधी पहाटे येते. तोपर्यंत विद्यार्थ्यांचा अभ्यास, गृहिणीचा स्वयंपाक रखडतो.रात्री डासांमुळे झोपेचेही तीनतेरा वाजत आहेत. दुपारनंतर वीज नसल्याने पाणी योजनेचे पंपिंग होत नाही आणि नळाला पाणी मिळत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर महिलांना विहिरीवरून पाणी आणावे लागते. पाऊस नसतानाही अखंडित वीज नसल्याने लोक पुरते हैराण झाले आहेत. सणासुदीचे दिवस असून संध्याकाळी पावसामुळे वीज सतत जाण्याने व्यापाºयांच्या धंद्यावरही परिणाम झाला आहे. वीज वितरण कार्यालयावर नुकताच मोर्चा नेऊनही वीजसेवेत कोणतीही सुधारणा होत नसल्याने येथील रहिवाशांमध्ये संताप आहे.
भारनियमनामुळे असंतोष :शहापुरात आंदोलनांचा भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 2:14 AM