कल्याण : बारवी आणि आंध्र धरणात मार्चअखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याने सध्या ३० टक्के पाणीकपात लागू करूनही परिस्थिती चिंताजनक बनली आहे. त्यासाठी पालिकेने पाणी व्यवस्थापनाचा आपत्कालीन आराखडा तयार केला असून तो मंगळवारी महासभेत मांडला जाणार आहे. आराखड्याची मागणी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केली होती. त्यानुसार, प्रशासनाने पालिकेच्या आठ प्रभाग क्षेत्रांत पुरविल्या जाणाऱ्या टँकरची संख्या वाढवून २० वरून २५ केली आहे. पालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांना जादा पाणी पुरवण्याचेही सुचविण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागात दोन बोअरवेल खोदल्या जाणार आहेत. नादुरुस्त असलेल्या बोअरवेल दुरुस्त करणे, विहिरी स्वच्छ करणे, शुद्ध पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी करण्याच्या आवाहनाचा यात समावेश आहे. पाण्यासाठी महिला पुन्हा रस्त्यावर कल्याण-शीळ रोडलगत असलेल्या टाटा पॉवर नाक्याजवळ पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या महिला सोमवारी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर आल्या. त्यांनी दुपारी रास्ता रोको केला. या वेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी धाव घेतली. स्थानिक नगरसेविका पाणीप्रश्नावर महिलांना दाद देत नसल्याचा आरोप महिलांनी केला. त्या वेळी या प्रश्नावर खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चेचे आश्वासन मिळाल्यावर महिलांनी आंदोलन मागे घेतले. खासदार निधीतून पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पाच लाख रुपये देण्याचे आश्वासन शिंदे यांच्यातर्फे देण्यात आले आहे.
पाणीबाणीवर आपत्कालीन आराखडा
By admin | Published: January 19, 2016 2:12 AM