कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर सकाळ- सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी पाहता वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना आता शिस्त लावण्यात येणार आहे. यात रांग सोडून प्रवासी भाडे घ्यायचे नाही; अन्यथा १ सप्टेंबरपासून कारवाई केली जाईल, असा इशारा कल्याणचे वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी रिक्षाचालकांना दिला आहे. केडीएमसीच्या स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत येथे लोखंडी बॅरिकेड्स बसविण्यात आले आहे, तर दुसरीकडे सोमवारपासून खासगी कंपन्यांच्या बसना स्थानक परिसरात येण्यास मनाई केली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
कल्याण हे मध्य रेल्वेचे जंक्शन असल्याने सार्वजनिक वाहनांसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी यासह लगतच्या ग्रामीण परिसरातून हजारो खासगी वाहने स्थानक परिसरात दर तासाला येत असतात. रेल्वेस्थानकातून बाहेर पडणारा लोंढाही मोठ्या प्रमाणात आहे. यात रस्त्यात बसणारे फेरीवाले, अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या रिक्षा परिणामी स्थानकातून बाहेर पडताच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रिक्षा स्टॅण्ड, टांगा स्टॅण्ड आणि बसस्थानक हे रेल्वेस्थानकाच्या परिसरातच असल्याने कोंडीत अधिकच भर पडते. दरम्यान, स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत स्थानक परिसरातील विकासाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. या ठिकाणच्या बेकायदा टपऱ्या व फेरीवाले दोन वर्षांपूर्वी हटविण्यात आले होते; परंतु फेरीवाल्यांच्या अतिक्रमणासह वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.
दुसरीकडे रांगेत भाडे न घेणाऱ्या रिक्षाचालकांकडून कोंडीची समस्या निर्माण होतेच त्याचबरोबर वादावादीचे प्रकारही वारंवार घडतात. दरम्यान, आता वाहतूक पोलिसांनी अस्ताव्यस्त रिक्षा उभ्या करणाऱ्यांना शिस्त लावण्याचा निर्णय घेतला आहे. रांगेव्यतिरिक्त प्रवासी घेणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई केली जाणार आहे. कोणाचीही मनमानी खपवून घेतली जाणार नाही. प्रवाशांनीही बॅरिकेडसच्या बाहेरील रिक्षात बसू नये. आतील रिक्षातूनच प्रवास करावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
--------
खाजगी बसना स्थानक परिसरात मनाई
खासगी कंपनीच्या बसना सोमवारपासून रेल्वेस्थानक परिसरात येण्यास मनाई केली आहे. दुर्गाडी येथेच त्या बस गोविंदवाडी बायपासमार्गे वळवून पत्रीपूल, पुढे एपीएमसी मार्केट, शहनाई हॉल येथे त्या पूर्णपणे थांबविल्या जातात. त्याठिकाणी यू टर्न घेऊन पुन्हा आल्यामार्गी त्या शहराबाहेर पाठविल्या जातात. परिणामी, सहजानंद चौक आणि शिवाजी चौक, तसेच स्थानक परिसरातील कोंडी ९० टक्के कमी झाल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. दरम्यान, असा प्रयोग डोंबिवलीतही झाला होता; परंतु नंतर तो बारगळला. त्यामुळे कल्याणचा प्रयोग यशस्वी होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
---------------