मुरलीधर भवार, कल्याणकल्याण-डोंबिवली शहरांचा अस्वच्छ शहरांच्या यादीत समावेश झाल्याने तेथे दीर्घकाळ सत्तेत असलेल्या शिवसेनेने हा डाग पुसून काढण्यासाठी स्वच्छतेचे शहरांच्या ‘परिवर्तना’चे अभियान छेडले. अभियान जरी कल्याण-डोंबिवली पालिका राबविणार असली तरी त्याची मूळ संकल्पना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आहे. प्रतिष्ठेच्या बनलेल्या या मोहीमेला शिवसेनेतून प्रतिसाद मिळेल. पण भाजपाने त्यातून अंग काढून घेतल्याने ही योजना शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग वाढवून योजनेत सासत्य राखण्याचे आव्हान शिवसेनेला पेलावे लागणार आहे. अस्वच्छ शहरांच्या यादीत कल्याण-डोंबिवलीचा समावेश झाल्याचे कळताच ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांना बोलावून त्यांची कानउघडणी केली होती. त्यातूनच ‘परिवर्तन’चा जन्म झाला. त्यानुसार शनिवारी तिचा शुभारंभ झाला. त्यासाठीच्या दौऱ्यात उद्धव यांनी त्यांनी शारदा मंदिर शाळेत काहीजणांच्या भेटी घेतल्या. समांतर रस्त्यावरील सेल्फी पाईंटचे उद्घाटन झाले. ह्रदयाच्या आकाराचा हा सेल्फी पॉईंट आकर्षण ठरला आहे. शहरात कचरा नियमित उचलला जात नाही. महापालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी काही प्रयत्न केले नाही, अशी ओरड केली जाते. प्रत्यक्षात नागरिकांनाही कचरा व्यवस्थापनाची चांगली सवय नाही. ती लावली जाणार आहे. अनेक ठिकाणी बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकले जाते. घराची दुरुस्ती केल्यावर जो काही घनकचरा तयार होतो तो देखील रस्ते-गटारात टाकला जातो. त्यावर नियंत्रण आणले जाणार आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्यावर बंदी आणणे हे त्यातीलच एक पाऊल आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांचा, कॉलेज यांचा सहभाग घेणे. हा सहभाग अपेक्षित असल्याने मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरु डॉ. नरेशचंद्र व डोंबिवलीत व्हिजन डोंबिवली हा प्रकल्प राबविणारे डॉ. उल्हास कोल्हटकर, कल्याण रोटरीचे मिलिंद कुलकर्णी यांचीही ठाकरे यांनी भेट घेतली. त्यांच्याकडूनही परिवर्तनासाठी सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वच्छ शहराच्या परिवर्तनासठी लोकसहभाग हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यातूनच परिवर्तन साध्य होणार आहे, यावर ठाकरे यांचा भर आहे.
अस्वच्छतेचा डाग पुसण्यावर सेनेच्या ‘परिवर्तन’चा भर
By admin | Published: May 09, 2016 1:59 AM